Chennai Super Kings New Captain : कॅप्टन कूल एमएस धोनी यानं चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवलं आहे. आयपीएल 2024 च्या हंगामात आता चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर असेल. सीएसकेनं सोशल मीडियावर अधिकृत याबाबतची माहिती दिली. धोनीशिवाय ऋतुराज गायकवाड दुसरा कर्णधार असेल. याआधी चेन्नईची धुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजा याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. पण अर्ध्या हंगामातच जाडेजानं धोनीकडे कर्णधारपद माघारी दिलं होतं. आता धोनीनं ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे.
धोनीनं CSK चं कर्णधारपद का सोडलं?
एमएस धोनी सध्या 42 वर्षांचा आहे, तो अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. धोनीनं ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. आता तो आयपीएलमधूनही निवृत्ती घेऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण यंदाचा हंगाम धोनीचा अखेरचा असेल. धोनीला बोल्ड निर्णय घेण्यासाठी ओळखलं जातं. धोनीची सध्याची हेअरस्टाईल 2004 प्रमाणेच आहे. धोनीनं जेव्हा क्रिकेटविश्वात पाऊल ठेवलं, तेव्हा धोनी लांब केसांची स्टाईल फेमस झाली होती. आता धोनी त्याच स्टाईलमध्ये दिसतोय. त्यामुळे त्याचा हा अखेरचा हंगाम असेल, असा कयास अनेकांनी बांधला आहे. अनेक माजी खेळाडूंनी धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असेल, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मागील हंगामात धोनीला निवृत्तबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं स्पष्ट काहीच सांगितलं नव्हतं. पण आता तो या हंगामानंतर निवृत्तीची घोषणा करु शकतो. त्यामुळेच ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
धोनीच्या चेन्नईनं पाचवेळा चषकावर नाव कोरलं -
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2023 चं विजेतपद पटकावत, पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला होता. चेन्नईने अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. चेन्नईनं पहिल्यांदा 2010 मध्ये आयपीएल चषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर 2011 मध्येही धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं जेतेपद पटकावलं. पण तिसऱ्यांदा चषक उंचावण्यासाठी चेन्नईला सात वर्ष वाट पाहावी लागली. चेन्नईने 2018 मध्ये तिसऱ्यांदा आयपीएल चषक उंचावला. त्यानंतर 2021 आणि 2023 मध्ये चेन्नईने जेतेपदावर नाव कोरले.
धोनीचं आयपीएल करियर -
एमएस धोनीनं पदार्पणाच्या आयपीएलमध्ये 414 धावा केल्या होत्या. त्यानं 2008 मध्ये 16 सामन्यात दोन अर्धशतकं ठोकली होती. धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 250 सामने खेळले आहेत, यादरम्यान त्यानं 5082 धावांचा पाऊस पाडला आहे. धोनीच्या नावावर 24 अर्धशतकांची नोंद आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 इतकी आहे.