5 Reasons Why SRH Lost Final Against KKR : कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या सतराव्या मोसमाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. कोलकात्यानं चेन्नईतल्या आयपीएल फायनलनवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव 113 धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल 57 चेंडू राखून पार केलं. महाअंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या हैदराबादने मोठ्या चूका केल्या, त्यामुळेच चषक विजयाचं त्यांचं स्वप्न भंगलं. हैदराबादच्या पराभवाची पाच कारणं जाणून घेऊयात...  


1- फलंदाजी घेणं - 


चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. नाणेफेकीवेळीच श्रेयस अय्यर याने आपण टॉस जिंकला असता तर प्रथम गोलंदाजी घेतली असती असं सांगितले. खेळपट्टी चाचपण्यात पॅट कमिन्स फेल ठरला.  


2- मिचेल स्टार्कचा तोड काढण्यात अपयश -


क्वालिफायर 1 सामन्यात मिचेल स्टार्क यानं हैदराबादची आघाडीची फळी तंबूत पाठवली होती. पॉवरप्लेमध्ये स्टार्कने भेदक मारा करत हैदराबादची कंबर मोडली होती. फायनलमध्येही स्टार्क यानं भेदक मारा करत हैदराबादच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. क्वालिफायर 1 सामन्यात स्टार्कमुळे पराभव स्विकारावा लागला होता, फायनलमध्येही स्टार्क येणार हे माहिती होतं. स्टार्कचा सामना कसा करायाचा,याचा अभ्यासच हैदराबादने केला नसल्याचे दिसले. फायनलमध्येही स्टार्कने पॉवरप्लेमध्ये हैदराबादच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. यामध्ये अभिषेक शर्माचाही समावेश होता.  


3- प्लान बी नव्हताच -


आयपीएल 2024 मध्ये हैदराबादने आक्रमक फलंदाजी केली, जे फायनलमध्ये त्यांत्यावर भारी पडले. संघाकडे विस्फोटक फलंदाज होते, पण त्याशिवाय त्यांच्याकडे प्लॅन बी नव्हताच..  झटपट विकेट पडत असताना एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला नाही. एकाही फलंदाजांने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच अंदाजामध्ये फलंदाजी सुरु होती. त्याचा फटका बसला. हैदराबादचा अख्खा संघ 113 धावांत ऑलआऊट झाला.  


4- सलामी फलंदाज फ्लॉप - 


आयपीएल 2024 मध्ये अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी 200 पेक्षा जास्त सरासरीने धावांचा पाऊस पाडला. पण फायनलमध्ये हे दोन्ही फलंदाज फेल ठरले. कोलाकात्याविरोधात शर्मा आणि हेड यांना मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादची फलंदाजीची भिस्त याच दोन्ही फलंदाजावर आहे. हे दोन्ही फलंदाज फ्लॉप ठरल्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  


5- दर्जेदार फिरकी गोलंदाज


चेन्नईच्या खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांना मदत करते, पण हैदराबादच्या ताफ्यात एकही दर्जेदार फिरकी गोलंदाज नव्हता. लाल मातीवर स्पिनर्सला टर्न मिळत होता. पण हैदराबादकडे एकही नावाजलेला फिरकी गोलंदाज नव्हता. कोलकात्याकडून सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी भेदक मारा केला. पण हैदराबादकडे दर्जेदार फिरकी गोलंजाच नव्हता.