नवी दिल्ली : आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या हंगामात अनेक विक्रमांची नोंद झालीय तर अनेक विक्रम मोडले गेले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम देखील मोडला गेलाय. सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) विरुद्ध सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम केला.सनरायजर्स हैदराबादनं यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध 277 धावा केल्या. यानंतर 20 दिवसांनी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 287 धावा केल्या. राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दहाव्या स्थानावर आहे. फलंदाजांनी आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटनं कुणी फलंदाजी केलीय हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 


स्ट्राईक रेटमध्ये टॉपवर कोण?


आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फलदाजांनी गोलंदाजांची धुलाई केलेली आहे. सर्वाधिक स्ट्राइक रेटनं फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत कोणत्यातरी संघाचा फलंदाज एक नंबरला असेल असं तुम्हाला वाटलं असेल पण पहिल्या स्थानावर कोणताही फलंदाज नसून गोलंदाज आहे. सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू जयदेव अनाडकट पहिल्या स्थानावर आहे. त्यानं आयपीएलमध्ये केवळ एक बॉल खेळला असून त्यानं त्यावर षटकार मारला आहे. यामुळं त्याचं स्ट्राइक रेट 600 इतक आहे. यानंतर दुसरं नाव रोमारियो शेफर्डचं आहे. रोमारियो शेफर्डनं 280 च्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग केली आहे. त्यानं 20 बॉलमध्ये 56 धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानावर कगिसो रबाडाचा समावेश असून त्यानं 3 बॉलमध्ये 8 धावा केल्या असून त्याचं  स्ट्राइक रेट 266 इतकं आहे.  महेंद्रसिंह धोनीनं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये 500 च्या स्ट्राइक रेटनं 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या होत्या. 


दिनेश कार्तिक देखील टॉपवर


आयपीएलमध्ये किमान 50 बॉल खेळलेल्या फलंदाजांचा विचार केला असता त्यामध्ये सर्वात पहिल्या स्थानावर दिनेश कार्तिक आहे. दिनेश कार्तिकनं 16 चौकार आणि 18 षटकार मारत 110 बॉलचा सामना करत 205 च्या स्ट्राइक रेटनं 226 धावा केल्या आहेत. 


पंजाबचा आशुतोष शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्यानं 76 बॉलमध्ये 205 च्या स्ट्राइक रेटनं 156 धावा केल्या आहेत. यानंतर कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलनं  64 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राइक रेटनं 128 धावा केल्या आहेत. 


दरम्यान, आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने येणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जाएंटसला पराभूत केलं होतं. आज सनरायजर्स हैदराबादचा पराभव करुन तिसरा विजय मिळवण्याची संधी दिल्ली कॅपिटल्सकडे आहे.  रिषभ पंतच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्स विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार का हे पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या :


एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं


लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!