IPL 2024, CSK, Devon Conway: आयपीएलचं (IPL 2024) बिगुल वाजलं असून यंदाचा इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार फलंदाज डेव्हॉन कॉन्वे (Devon Conway) दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे. त्याला दुखापतीमुळे तब्बल आठ आठवडे क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे. त्यामुळे कॉन्वेला आयपीएलच्या यंदाच्या सीझनपासून दूर राहावं लागणार आहे. 

कॉन्वेच्या दुखापतीमुळे सीएसके अडचणीत? 

डेव्हन कॉन्वेच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया होणार असून, त्यामुळे तो अनेक आठवडे मैदानावर परतणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विकेट किपिंग करताना कॉन्वेला नुकतीच अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे कॉन्वेला लगेच मैदान सोडावं लागलं. दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटी सामन्यातही खेळू शकला नाही.

एक्स-रेमध्ये कोणतंही मोठे फ्रॅक्चर आढळलं नाही. दरम्यान, पुढील स्कॅन आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं (NZC) कॉनवेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, "कॉन्वेच्या अंगठ्याला थोडंसं फ्रॅक्चर झालं आहे आणि या आठवड्यातच त्याचं ऑपरेशन केलं जाईल. आठ आठवड्यांत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे."

CSK साठी हुकुमी एक्का कॉन्वे 

32 वर्षीय डेव्हॉन कॉन्वेनं पाचव्यांदा CSK चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कॉन्वेनं IPL 2023 मध्ये CSK साठी सर्वाधिक 672 धावा केल्या होत्या. या काळात ऋतुराज गायकवाडसह कॉन्वेनं संघाला अनेक प्रसंगी अप्रतिम सुरुवात करून दिली. कॉन्वेनं गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात 25 चेंडूत 47 धावांची खेळीही खेळली होती. चेन्नई सुपर किंग्सनं 2022 च्या लिलावात कॉन्वेला त्याच्या मूळ किंमत 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. या डावखुऱ्या फलंदाजानं आतापर्यंत आयपीएलमधील 23 सामन्यांमध्ये 46.12 च्या सरासरीनं आणि 141.28 च्या स्ट्राईक रेटनं 924 धावा केल्या आहेत. कॉन्वे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्यानं आतापर्यंत 20 कसोटी, 32 एकदिवसीय आणि 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 22 मार्च रोजी आयपीएल 2024 मधील पहिल्या सामन्यात CSK ची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध लढत होईल.

धोनीची चेन्नई पाचवेळा विजेती 

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2023 चं विजेतपद पटकावत, पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला होता. चेन्नईने अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने  शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.

सीझन विजेता उपविजेता 
2008 राजस्थान रॉयल्स  चेन्नई सुपर किंग्सचा 3 विकेट्सनी पराभव 
2009 डेक्कन चार्जर्स  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 विकेट्सनी पराभव 
2010 चेन्नई सुपर किंग्स  मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव 
2011 चेन्नई सुपर किंग्स   रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 58 धावांनी पराभव 
2012 कोलकाता नाईट रायडर्स  चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सनी पराभव 
2013 मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सचा 23 धावांनी पराभव 
2014 कोलकाता नाईट रायडर्स  पंजाब किंग्सचा 3 विकेट्सनी पराभव 
2015 मुंबई इंडियन्स  चेन्नई सुपर किंग्सचा 41 धावांनी पराभव 
2016 सनरायझर्स हैदराबाद  रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा 8 धावांनी पराभव 
2017 मुंबई इंडियन्स  रायझिंग पुणे सुपरजायंटचा 1 धावेनं पराभव 
2018 चेन्नई सुपर किंग्स  सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सनी पराभव 
2019 मुंबई इंडियन्स  चेन्नई सुपर किंग्सचा 1 धावेनं पराभव 
2020 मुंबई इंडियन्स  दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव 
2021 चेन्नई सुपर किंग्स  कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव 
2022 गुजरात टायटन्स  राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सनी पराभव 
2023 चेन्नई सुपर किंग्स  गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सनी पराभव 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

"रिश्ते में तो हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है हार्दिक पांड्या"; मुंबई इंडियन्सच्या नव्या कॅप्टनचा रोख नेमका कुणीकडे?