IPL Auction : दुबईमध्ये सुरु असलेल्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडलाय. यामधील पाच खेळाडूंना दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली. हर्षल पटेल सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरलाय. त्याच्यावर पंजाब किंग्स संघाने डाव खेळला. कोलकात्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू खरेदी केला. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले. आजच्या लिलावात दोन खेळाडूंवर 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली. पाहूयात कोणत्या खेळाडूंवर दहा कोटींपेक्षा जास्त बोली लागली.
मिचेल स्टार्क
मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. त्याच्यावर कोलकात्याने 24.75 कोटी रुपयांची बोली लावली. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 2015 मध्ये शेवटची आयपीएल खेळली होती. आठ वर्षानंतर स्टार्क पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. स्टार्कसाठी आज सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्स, नंतर मुंबई इंडियन्स, नंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि त्यानंतर गुजरात टायटन्सनेही बोली लावली. पण अखेर कोलकात्याने 24.5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली,त्याचा आपल्या संघात समावेश केला.
पॅट कमिन्स -
यंदाच्या आयपीएलमधील दुसरा महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हा आहे. पॅट कमिन्सवर सनरायजर्स हैदराबाद संघाने विश्वास दाखवलाय. कमिन्सला हैदराबादने 20.50 कोटी रुपयांत खरेदी केलेय. कमिन्स वेगवान गोलंदाजी करण्यासोबत तळाला फलंदाजी करण्यास माहीर आहे. त्याशिवाय कर्णधार म्हणूनही तो चांगली कामगिरी करु शकतो. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्जने पॅट कमिन्सच्या नावाने बोली सुरू केली होती. त्याच्यापाठोपाठ मुंबई इंडियन्सनेही या खेळाडूला विकत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यानंतर आरसीबी आणि चेन्नई यांच्यात चुरस झाली. शेवटी सनरायझर्स हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात या खेळाडूसाठी स्पर्धा झाली. अखेर हैदराबादनेच कमिन्सला 20.50 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतले.
डॅरल मिचेल -
डॅरेल मिचेल याला धोनीच्या चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय. त्याच्यासाठी चेन्नईने 14 कोटी रुपये खर्च केले. न्यूझीलंडच्या अष्टपैलू डॅरेल मिचेलसाठी दिल्ली आणि पंजाब यांच्यामध्ये लढत झाली. दोन्ही संघाने अष्टपैलू खेळाडूवर भर दिलाय. दिल्लीला मधल्या षटकात भरवशाचा फलंदाज हवा होता, त्यासाठी त्यांनी डॅरेल मिचेलवर बोली लावली. 11 कोटींपेक्षा पुढे बोली गेल्यानंतर दिल्लीने माघार घेतली, पण त्यावेळी चेन्नईने यामध्ये उडी घेतली. चेन्नईने अखेर 14 कोटी रुपयांमध्ये डॅरेल मिचेल याला ताफ्यात घेतले. डॅरेल मिचेल, डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र आणि मिचेल सँटनर असे चार न्यूझीलंडचे खेळाडू चेन्नईच्या ताफ्यात असतील.
हर्षल पटेल
भारताचा अष्टपैलू खेळाडू हर्षल पटेल याच्यासाठी पंजाब किंग्सने मोठी बोली लावली. पंजाब किंग्सने हर्षल पटेल याला 11.75 कोटी रुपये खर्च करत आपल्या ताफ्यात घेतले. हर्षल पटेल याला बेस प्राईजपेक्षा जवळपास सहा पट अधिक रक्कम मिळाली आहे. हर्षल पटेल याची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. त्याच्यासाठी प्रिती झिंटाच्या पंजाबने 11.75 कोटी रुपये खर्च केले. हर्षल पटेलसाठी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी बिडिंग केली, पण अखेर पंजाब किंग्सने बाजी मारली.याआधी हर्षल पटेल आरसीबी संघाचा सदस्य होता. पण आरसीबीने त्याला रिलिज केले. त्याला 2023 मध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आयपीएल 2023 लिलिवात आरसीबीने त्याला 10.75 कोटी रुपयांत खरेदी केले होते. आयपीएलमध्ये हर्षल पटेल याने आरसीबीशिवाय दिल्ली आणि मुंबई संघामध्ये खेळला आहे. यंदा हर्षल
पटेल पंजाबच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.
अल्जारी जोसेफ -
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 11 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करुन घेतले. 2019 च्या आयपीएलमध्ये अल्जारीची निवड ही मुंबईच्या संघासाठी झाली होती. 6 एप्रिल 2019 रोजी, त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 12 धावांत 6 बळी घेतले,जे आयपीएल पदार्पणातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक ठरले. 2021 च्या आयपीएल लिलावामध्ये तो अनसोल्ड राहिला. 2022 IPL मेगा लिलावात, त्याला गुजरात टायटन्सने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले.