IPL Auction List : आयपीएल 2024 साठी लिलावातील खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 1166 खेलाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 333 नावाची निवड करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी दुबाईमध्ये या 333 खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. यामधील 77 खेळाडू मालमाल होणार आहे. कारण, दहा खेळाडूंकडे फक्त 77 खेळाडूंची जागा शिल्लक आहे.
333 खेळाडूंपैकी 214 जण भारतीय आहेत तर 119 खेळाडू परदेशी (overseas players) आहेत. दोन खेळाडू असोशिएट देशांचे आहेत. 116 खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत तर 215 खेळाडू अनकॅप (uncapped players) आहेत. 23 खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. दहा संघामध्ये फक्त 77 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे, त्यामध्ये 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.
दोन कोटी मूळ किंमत असणाऱ्यामध्ये तीन भारतीय -
आयपीएल लिलावात 23 खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे. त्यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. अनुभवी उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि हर्षल पटेल यांनी आपली मूळ किंमत 2 कोटी ठेवली आहे. 20 परदेशी खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी ठेवली आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे आणि इंग्लंडचे प्रत्येकी सात सात खेळाडू आहेत. ट्रेविस हेड, हॅरी ब्रूक, रिली रुसो, स्टीव स्मिथ, जेराल्ड कोएत्जी, पॅट कमिन्स, ख्रिस वोक्स, जोश इंग्लिंश, लॉकी फर्ग्यूसन, जोश हेजलवुड, मिचेल स्टार्क, मुजीब उर रहमान, आदिल रशीद, रासी वान डेर डूसन, जेम्स विंस, शॉन एबॉट, जेमी ओवरटन, डेविड विली, बेन डुकैत आणि मुस्ताफिजुर रहमान यांनी मूळ किंमत दोन कोटी ठेवली आहे.
1.5 कोटीमध्ये सर्व परदेशी -
13 खेळाडूंनी आपली मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी ठेवली आहे. त्यामध्ये वानिंदु हसरंगा, फिलिप साल्ट, कॉलिन मुनरो, शेरफेन रदरफोर्ड, टॉम करन, जेसन होल्डर, मोहम्मद नबी, जेम्स नीशम, डेनियल सेम्स, ख्रिस जॉर्डन, टाइमल मिल्स, जाई रिचर्डसन, टीम साउदी यांचा समावेश आहे.
262.95 कोटी रुपये होणार खर्च -
दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये 19 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता आयपीएल लिलावाला सुरुवात होणार आहे. सर्व 10 संघ 262.95 रुपयांसह लिलावाच्या टेबलवर बसतील. सर्वात जास्त रक्कम गुजरातच्या पर्समध्ये आहे. दहा संघांना 77 खेळाडूंना खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये परदेशी खेळाडूंची संख्या 30 आहे. कोलकाता संघाकडे सर्वाधिक स्लॉट शिल्लक आहेत. कोलकाता संघाला आपल्या ताफ्यात 12 खेळाडूंना घ्यायचे आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात संघाकडे (38.15 करोड़) सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे.
संघ | एकूण खेळाडू | परदेशी खेळाडू | शिल्लक रक्कम | किती खेळाडूंची जागा? | परदेशी खेळाडूंची जागा |
CSK | 19 | 5 | 31.4 | 6 | 3 |
DC | 16 | 4 | 28.95 | 9 | 4 |
GT | 17 | 6 | 38.15 | 8 | 2 |
KKR | 13 | 4 | 32.7 | 12 | 4 |
LSG | 19 | 6 | 13.15 | 6 | 2 |
MI | 17 | 4 | 17.75 | 8 | 4 |
PBKS | 17 | 6 | 29.1 | 8 | 2 |
RCB | 19 | 5 | 23.25 | 6 | 3 |
RR | 17 | 5 | 14.5 | 8 | 3 |
SRH | 19 | 5 | 34 | 6 | 3 |
एकूण | 173 | 50 | 262.95 | 77 | 30 |