IPL 2023, CSK vs SRH: रविंद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादच्या संघाची दाणादाण उडाली. हैदराबाद संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकली. अभिषेक शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला तीस धावसंख्येचा पल्ला पार करत आला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. रविंद्र जाडेजाने तीन विकेट घेत हैदराबादचे कंबरडे मोडले. हैदराबादचा संघ निर्धारित २० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात १३४ धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईला विजयासाठी १३५ धावांची गरज आहे.



नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने संयमी सुरुवात केली. हॅरी ब्रूक आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली. पण हॅरी ब्रूक याला आकाश सिंह याने तंबूत धाडले. हॅरी ब्रूक याने १३ चेंडूत १८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले.  हॅरी ब्रूक बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी डाव सावरला. दोघांनी चांगली भागिदारीही केली. ही जोडी जमली असे वाटत असतानाच रवींद्र जाडेजाने लागोपाठ दोन विकेट घेतल्या. जाडेजाना आधी अभिषेक शर्माला रहाणेकरवी झेलबाद केले. अभिषेक शर्मा याने २६ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीही लगेच तंबूत परतला.


राहुल त्रिपाठीने २१ चेंडूत २१ धावांची खेळी केली. या खेळीत त्रिपाठीने एक चौकार आणि एक षटकार लगावला. त्रिपाठीनंतर कर्णधार एडन मार्करमही १२ धावांवर बाद झाला. हेनरिक कालसेन याला चांगली सुरुवात मिळाली होती..पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. कालसेन याने १६ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. मयंक अग्रवाल याला हैदराबादने फिनिशर म्हणून खेळवले.. पण मयंक जाडेजाच्या चेंडूवर बाद झाला. मयंक अग्रवाल अवघ्या दोन धावा काढून बाद झाला. 


वॉशिंगटन सूंदर आणि मार्को जानसेन यांनी अखेरच्या दोन षटकात आक्रमक फलंदाजी केल्यामुळे हैदराबादची धावसंख्या १३० च्या पुढे पोहचली. वॉशिंगटन सुंदर याने ९ धावा केल्या तर मार्को जानसन याने १७ धावांचे योगदान दिले. हैदराबादच्या संपूर्ण डावात फक्त दोन षटकार आणि ११ चौकार लगावण्यात आला आहे. 



चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच अचूक टप्प्यावर मारा केला. आकाश सिंह, तुषार देशपांडे आणि ज्युनिअर मलिंगा यांनी भेदक मारा केला. तर मोईन अली, रविंद्र जाडेजा आणि महिश तिक्ष्णा यांनी फिरकीच्या जाळ्यात हैदराबादच्या फलंदाजांना फसवले. जाडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. जाडेजाने ४ षटकात २२ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर आकाश सिंह, महिश तिक्ष्णा, पथिराणा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.