Shikhar Dhawan, Punjab Kings Captain : आयपीएलच्या (IPL 2023) अगामी हंगामाआधी पंजाब किंग्स (Punjab Kings) संघानं मोठा फेरबदल केला आहे. मयांक अग्रवाल याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे.  सलामी फलंदाज शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. पंजाब किंग्सनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 


रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत बीसीसीआयनं शिखर धवनकडे भारतीय संघाची धुरा सोपवली होती.  न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. याआधी दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात झालेल्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवननं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. पंजाब किंग्स संघानेही आयपीएल 2023 च्या आधी शिखर धवनकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. मयांक अग्रवालच्या तुलनेत शिखर धवनकडे कर्णधारपदाचा अनुभव जास्त आहे. त्याचाच विचार करत पंजाबनं शिखरकडे संघाची धुरा सोपवली आहे. 


आयपीएल 2022 च्या वेळी शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवण्यावर पंजाबच्या संघाच्या निवडकर्त्यांमध्ये चर्चा झाली होती.  पण त्यावेळी अखेरच्या क्षणी मयांक अग्रवालकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. पण मयांक अग्रवालच्या नेतृत्वात पंजाबला कामगिरी सुधारता आली नाही. पंजाबची कामगिरी अधिकच खराब झाली होती. पंजाबचा संघ ग्रुप स्टेजमध्ये बाहेर गेला होता. आता पुढील हंगामाआधी पंजाबनं शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवली आहे. 






मागील हंगामात शिखरची दमदार फलंदाजी -
सलामी फलंदाज शिखर धवनने आयपीएलच्या मागील हंगामात दमदार फलंदाजी केली होती. मयांकच्या तुलनेत धवनने चांगलं प्रदर्शन केलं होतं. धवनने 14 सामन्यात 38 च्या सरासरीनं 460 धावा केल्या होत्या. पंजाबकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये शिखर पहिल्या क्रमांकावर होता. या हंगामात धवनने तीन अर्धशतकं झळकावली होती. आयपीएल 2022 मध्ये मयांकला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नव्हती. मयांक अग्रवालने 12 डावात 16 च्या खराब सरासरीनं फक्त 196 धावा केल्या होत्या. मयांकला फक्त एक अर्धशतक झळकावता आलं होतं.   


पंजाब किंग्सचा संघ


मयांक अगरवाल (12 कोटी),अर्शदीप सिंह (4 कोटी), शिखर धवन (8.25 कोटी),कागिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेअरस्टो (6.75 कोटी), शाहरुख खान (9 कोटी), राहुल चहर (5.25 कोटी), हरप्रीत ब्रार (3.8 कोटी), प्रभसिमरन सिंह (60 लाख), जितेश शर्मा (20 लाख), इशान पोरेल (25 लाख), लियाम लिव्हिंगस्टोन (11.5 कोटी), ओडियन स्मिथ (6 कोटी), संदीप शर्मा (50 लाख), राज बावा (2 कोटी), ऋषी धवन (55 लाख), प्रेरक मंकड (20 लाख), वैभव अरोरा (2 कोटी), आर. चॅटर्जी (20 लाख), बलतेज सिंह (20 लाख), अंश पटेल (20 लाख), नॅथन एलिस (75 लाख), अथर्व तायडे (20 लाख), बेनी हॉवेल (40 लाख), भानुका राजपक्षे (50 लाख).