IPL 2023, RCB vs RR Pitch Report : आयपीएलच्या मैदानात आज 60 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं अंत्यंत महत्त्वाचं आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये राजस्थाननं 12 आणि बंगळुरूनं 14 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचा आजचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे, जिथे दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा भिडले आहेत. या सामन्यांमध्ये राजस्थाननं 4 तर बंगळुरूनं 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात सवाई मानसिंह स्टेडिअमवरील खेळपट्टीचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. जाणून घेऊया खेळपट्टीबाबत सविस्तर...  


Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.


डू प्लेसिस अन् यशस्वी जायस्वालमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस 


पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याच्या प्रयत्नात असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ रविवारी राजस्थान रॉयल्सशी (RR) भिडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांसोबतच दोन्ही संघातील दिग्गज खेळाडू यशस्वी जायस्वाल आणि फाफ डू प्लेसिस यांच्यातही रोमांचक लढत दिसणार आहे. दोघेही ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील आघाडीचे खेळाडू आहेत. सध्या ऑरेंज कॅप फाफच्या ताब्यात आहेत. तर ऑरेंज कॅप फाफकडून हिसकावण्यासाठी यशस्वीला केवळ एका धावेची गरज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोघांमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की. 


पॉईंट टेबलमध्ये दोन्ही संघ कोणत्या स्थानी? 


राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉईंटटेबलमधील स्थितीबाबत बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या संघानं त्यांच्या 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. तसेच, RCB 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरूच्या संघानं 11 सामन्यांत 5 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. दुसरीकडे, जर आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. पण घरच्या मैदानावर आरआरला पराभूत करणं आरसीबीसाठी सोपं नसणार आहे, एवढं मात्र नक्की 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.