LSG vs RCB, 1 Innings Highlights: लखनौच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. इकानाच्या खेळपट्टीवर लखनौच्या गोलंदाजीसमोर आरसीबीने निर्धारित २० षटकात नऊ विकेटच्या मोबदल्यात १२६ धावांपर्यंत मजल मारली. सलामी भागिदारी वगळता आरसीबीच्या फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करता आली नाही. आरसीबीच्या फलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. लखनौला विजयासाठी १२७ धावांची गरज आहे.



नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने संयमी सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी एकेरी आणि दुहेरी धावसंख्यावर भर देत आरसीबीची धावसंख्या वाढवली. इकाना स्टेडिअमची खेळपट्टी संथ आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाज पहिल्या षटकापासूनच गोलंदाजीसाठी उतरले होते. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस याने नऊ षटकात ६२ धावांची सलामी दिली. विराट कोहली याने ३० चेंडूत ३१ धावांची खेळी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ आणि अनुज रावत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रावत नऊ धावांर बाद झाला. रावत याने ११ चेंडूंत नऊ धावांची खेळी केली.


ग्लेन मॅक्सवेल याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मॅक्सवेल याला बिश्नोई याने तंबूत पाठवले. मॅक्सवेल याने चार धावांचे योगदान दिे. सुयेश प्रभुदेसाई स्वस्तात माघारी परतला. अमित मिश्रा याने प्रभुदेसाई याला तंबूचा रस्ता दाखवला. एका बाजूला विकेट पडत असताना फाफ याने दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी केली. फाफ डु पलेसिस याने ४० चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले. फाफ याने आपल्या खेलीत एक चौकार आणि एक षटकार लगावला. महिपाल लोमरोर याला तीन धावांवर नवीन उल हक याने बाद केले. दिनेश कार्तिक लयीत दिसत होता.. पण धाव घेण्याच्या प्रयत्नात कार्तिक याने विकेट फेकली. यश ठाकूर याने कार्तिकला धावबाद केले. कार्तिक बाद झाल्यामुळे आरसीबीच्या धावसंख्येला खीळ बसली. कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज दोघांना नवीन उल हक याने एकापाठोपाठ एक बाद केले. दोघांनाही खाते उघडता आले नाही. हसरंगा याने नाबाद आठ धावांची खेळी केली. हेजलवूड एक धावांवर नाबाद राहिला. 



इकानाच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा दबदबा दिसला.  लखनौने चार फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी दिली होती. कृणाल पांड्या याने डावाचे पहिलेच षटक फेकले होते. कृणाल पांड्या याने चार षटकात फक्त २१ धावा दिल्या. रवि बिश्नोई याने चार षटकात २१ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. अमित मिश्रा याने तीन षटकात २१ धावा खर्च खरत दोन विकेट घेतल्या. तर कृष्णाप्पा गौतम याने दोन षटकात फक्त दहा धावा खर्च केल्या. गौतम याने एक विकेट घेतली. नवीन उल हक याने भेदक मारा केला. नवीन याने चार षटकात ३० धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या.