CSK vs PBKS, Match Highlights: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार पंजाबच्या किंग्सने जिंकला. पंजाबने चेन्नईवर चार विकेटने बाजी मारली. चेन्नईने दिलेले 201 धावांचे आव्हान पंजाबने अखेरच्या चेंडूवर पार केले. पंजबाच्या एकाही फलंजाने अर्धशतक झळकावले नाही, तरिही सांघिक खेळाच्या बळावर चेन्नईला मात दिली. चेन्नईच्या डेवेन कॉनवे याची नाबाद 92 धावांची खेळी व्यर्थ गेली. 


चेन्नईने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली. प्रभसिमरन आणि शिखर धवन यांनी 4.2 षटकात 50 धावांची भागिदारी केली. शिखर धवन याने 15 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावले. धवन बाद झाल्यानंतर अथर्व तायडे आणि प्रभसिमरन यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही एकापाठोपाठ एक बाद झाले. प्रभसिमरन याने 24 चेंडूत 42 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि चार चौकार लगावले. अथर्व तायडे याने 13 धावांचे योगदान दिले. लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. दोघांनी पंजाबची धावसंख्या झटपट वाढवली. लियाम लिव्हिंगस्टोन याने 24 चेंडूत 40 धावांची खेळी केली. यामध्ये चार खणखणीत षटकार लगावले. तर सॅम करन याने 29 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन बाद झाल्यानंतर पंजाबच्या अडचणीत वाढ झाली होती. पण जितेश शर्मा याने फटकेबाजी केली.


मराठमोळ्या जितेश शर्मा याने अखेरच्या षठकात वादळी फलंदाजी केली. जितेश शर्मा याने मोक्याच्या क्षणी 10 चेंडूत 21 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकार लगावले. सिकंदर रजा याने सात चेंडूत 13 धावा करत पंजाबला थरारक विजय मिळवून दिला. अखेरच्या दोन चेंडूवर पाच धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर दोन धावा घेण्यात आल्या. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. रजा याने जोरदार फटका मारत तीन धावा काढल्या. पंजाबचा थरारक विजय झाला. 


चेन्नईकडून तुषार देशपांडे याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आणि सर्वाधिक धावाही खर्च केल्या. तुषार देशपांडे याने चार षटकात 49 धावा खर्च केल्या. रविंद्र जाडेजा याने चार षटकार 32 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. मथिशा पथीराना याने एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांची पाटी कोरी राहिली.  


दरम्यान, डेवेन कॉनवच्या दमदार खेलीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 200 धावांपर्यंत मजल मारली. कॉनवे याने नाबाद 2 धावांची खेळी केली. कॉनवेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही.  


कॉनवेचे दमदार खेळी - 


एकीकडे विकेट पडत असताना डेवेन कॉनवे याने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासूनच कॉनवेने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कॉनवेच्या फलंदाजीपुढे पंजाबची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. डेवेन कॉनवेने 52 चेंडूत नाबाद 92 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने एक षटकार आणि 16 चौकार लगावले.   


चेन्नईची फलंदाजी कशी झाली ?


चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी चेन्नईला दमदार सुरुवात दिली. दोघांनी 86 धावांची भागिदारी केली. ऋतुराज गायकवाड याने संयमी फलंदाजी केली तर कॉनवे याने फटकेबाजी केली. दोघांनी सुरुवातीपासूनच पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ऋतुराज गायकवाड याने 37 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि चार चौकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज बाद झाल्यानंतर कॉनवेने शिवम दुबेला सोबत घेत चेन्नईच्या डावाला आकार दिला. शिवम दुबे याने 17 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. कॉनवेने दुबेसोबत 26 चेंडूत 44 धावांची भागिदारी केली. 


दुबे बाद झाल्यानंतर कॉनेवेने मोईन अलीसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोईन अली याला मोठी खेळी करता आली नाही. मोईन अली सात चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. मोईन अली बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजासोबत कॉनवेने फिनिशिंग टच दिला. अखेरच्या षटकात जाडेजाला सॅम करन याने तंबूत पाठवले. जाडेजाने 10 चेंडूत  12 धावांचे योगदान दिले. धोनीने अखेरच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावत चेन्नईची धावसंख्या 200 पर्यंत पोहचवली. धोनीने चार चेंडूत 13 धावांचे योगदान दिले. 


पंजाबची गोलंदाजी कशी - 


पंजाबच्या गोलंदाजांना अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. प्रत्येक गोलंदाजांनी धावा खर्च केल्या. अर्शदीप सिंह, सॅम करन, राहुल चहर आणि सिकंदर रजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तर कगिसो रबाडा आणि लियाम लिव्हिंगस्टोनची पाटी कोरीच राहिली.