LSG vs GT, IPL 2023 : हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक आणि वृद्धीमान साहाची संयमी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित २० षटकात १३५ धावांपर्यंत मजल मारली. लखनौकडून कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत गुजरातला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. लखनौला विजयासाठी 136 धावांची गरज आहे.


गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इकानाची खेळपट्टी संथ असल्यामुळे दोन्ही संघाला प्रथम फलंदाजी करायची होती.  पण नाणेफेकीचा कौल हार्दिक पांड्याने जिंकला. पण गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. भन्नाट फॉर्मात असलेला शुभमन गिल गोल्डन डकचा शिकार झाला.. कृणाल पांड्याने शुभमन गिल याला तंबूचा रस्ता दाखवला. गिल बाद झाल्यानंतर साहा आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला. हार्दिक पांड्या याने संयमी फलंदाजी केली तर दुसऱ्या बाजूला साहा याने धावगती वाढवली.


वृद्धीमान साहा आणि हार्दिक पांड्या यांनी ५५ चेंडूत ६८ धावांची भागिदारी केली. गुजरातकडून ही सर्वात मोठी भागिदारी होय. साहा याने ३७ चेंडूत ४७ धावांचे योगदान दिले. या खेळीत साहाने सहा चौकार लगावले. वृद्धीमान साहा याची विकेट गेल्यानंतर गुजरातच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. अभिनव मनोहर आणि विजय शंकर स्वस्तात माघारी परतले. मनोहर तीन तर विजय शंकर दहा धावा काढून बाद झाला. 


अखेरीस हार्दिक पांड्याने सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. जम बसलेल्या हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याने ६६ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्याने डेविड मिलर याच्यासोबत २६ चेंडूत ४० धावांची भागिदारी केी. यामध्ये हार्दिक पांड्याने १६ चेंडूत ३४ धावांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याने रवी बिश्नोई याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. 


हार्दिक पांड्याने ५० चेंडूत ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. सुरुवातीपासून हार्दिक पांड्याने संयमी फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने एक बाजू लावून धरली होती. अखेरीस हार्दिक पांड्याने २०० च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या. हार्दिक पांड्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने १३० धावांचा पल्ला पार केला. हार्दिक पांड्याने आपल्या खेळीत चार षटकार आणि दोन चौकार लगावले.


लखनौकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक भेदक मारा केला. पांड्याने चार षटकात सोळा धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मार्कस स्टॉयनिस याने तीन षटकात २९ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. त्याशिवय नवीन उल हक आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. रवी बिश्नोई सर्वात महागडा ठरला. बिश्नोईने चार षटकात ४९ धावा खर्च केल्या. ज्या मैदानावर फलंदाजांना धावा जमवता येत नव्हत्या.. तिथे बिश्नोईने प्रति षटक १२ पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा दिल्या.