LSG vs RBC, Gautam Gambhir Reaction : एम चिन्नास्वामी स्टेडिअवर लखनौने अखेरच्या चेंडूवर आरसीबीचा पराभव करत थरारक विजय मिळवला.  आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दोन विकेटच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल लखनौने अखेरच्या चेंडूवर एक विकेट राखून थरारक विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चांहत्याचा श्वास रोखला होता. प्रत्येक चेंडूनंतर चाहत्यांची धडधड वाढत होती. आरसीबीच्या चाहते प्रत्येक चेंडूनंतर उत्साही असल्याचे दिसत होते. या सामन्यात लखनौने बाजी मारली.. त्यानंतर लखनौचा मेंटोर गौतम गंभीर याची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. तोंडावर बोट ठेवून जणू त्याने आरसीबीच्या चाहत्यांना गप्प राहण्याचा इशाराच केला होता. गौतम गंभीर याची ही रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 
लखनौला अखेरच्या षटकात पाच धावांची गरज होती. आरसीबीकडून अखेरचे षटकाची जबाबदारी हर्षल पटेल याच्यावर होते. जयदेव उनादकट याने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर हर्षल पटेल याने मार्क वूड याला तंबूत पाठवले. तिसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोई याने दोन धावा घेत सामना पुन्हा पलटवला. चौथ्या चेंडूवर बिश्नोई याने एक धाव घेतली. धावसंख्या बरोबर झाली होती. सामना लखनौकडे झुकला होता. पण हर्षल पटेल याने जयदेव उनादकट याला बाद करत पुन्हा रंगत वाढवली. आता लखनौला विजयासाठी एका चेंडूवर एका धावेची गरज होती. आवेश खान फलंदाजी करत होता. हर्षल पटेलचा चेंडू आवेश खानच्या बॅटला लागला नाही, पण बायच्या स्वरुपात एक धाव घेण्यात फलंदाजांना यश मिळाले. या विजयानंतर गौतम गंभीर याचा संयम सुटला.. इतकावेळ शांत असणारा गंभीर आक्रमक झाला होता. त्याने तोंडावर बोट ठेवत आरसीबीच्या चाहत्यांना गप्प राहण्याचा इशाराच केला, अशी चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमच्या गंभीर रिअॅक्शनचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत..