Popular Fights in IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सध्या विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या वादावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात मैदानावर खेळांडूंमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाही.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) आतापर्यंतच्या इतिहासात चाहत्यांना मैदानावर अनेक दृश्ये पाहायला मिळाली आहेत, ज्याची संपूर्ण हंगामात सर्वाधिक चर्चा झाली. आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. हे भांडण यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. पण आयपीएलच्या इतिहासात याआधी कोणत्या खेळांडूंमध्ये भांडण झाली आहेत जाणून घ्या.
हरभजन सिंह आणि श्रीसंत
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठं भांडण पहिल्या हंगामात पाहायला मिळालं. आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये हरभजन सिंह आणि एस. श्रीसंत यांच्या भांडण झालं होतं. हा वाद इतका वाढला की, हरभजन सिंहने श्रीसंतला भरमैदानात कानशिलात लगावली. यानंतर हरभजन सिंहवर संपूर्ण हंगाम खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.
कायरन पोलार्ड आणि मिचेल स्टार्क
2014 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल मोसमात कायरन पोलार्ड आणि मिचेल स्टार्क यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. पोलार्डने रागाने आपली बॅट जमिनीवर फेकली. यादरम्यान पंचांना मध्यस्थी करून या दोन खेळाडूंमधील वाद मिटवावा लागला होता.
कोहली आणि गंभीर यांच्यातील जुना वाद
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडण झालं. पण, या दोघा खेळाडूंमधील बाचाबाचीची ही पहिली वेळ नाही. याआधीही या दोघांचं आयपीएलमध्ये भांडण झालं आहे. आयपीएल 2013 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात पहिल्यांदा मैदानावर जोरदार वाद झाला. कोहली आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जात असताना, या दोघांमध्ये बाचाबाची झाली. अखेर मैदानावरीन इतर खेळाडूंना यामध्ये मध्यस्थी करावी लागली.
अंबाती रायडू आणि हर्षल पटेल
आयपीएल 2012 च्या मोसमात, मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज अंबाती रायडूचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाज हर्षल पटेलशी जोरदार वाद झाला. यानंतर रायडूला मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठाण्यात आला, तर हर्षललाही 25 टक्के दंड ठोठावण्यात आला.
यंदाच्या हंगामातील कोहली आणि गंभीर वाद
आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला. यावेळी सहकारी खेळाडूंनाही त्यांना शांत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.