DC vs SRH, Match Highlights : अटतटीच्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. सात सामन्यात दिल्लीचा हा दुसरा विजय होय. तर हैदराबादचा सात सामन्यात हा पाचवा पराभव झाला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या गुणतालिकेतील तळाच्या दोन्ही संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. या दोन्ही संघाला आयपीएलमध्ये आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दिल्लीने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा  संघ सहा विकेटच्या मोबद्लयात 137 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीकडून मुकेश कुमार याने अखेरचं षटक जबरदस्त टाकले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती, मुकेश कुमार याने या षटकात एकही चौकार न देता दिल्लीला विजय मिळवून दिला. 


दिल्लीने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. हॅरी ब्रूक सात धावा काढून तंबूत परतला. 31 धावांवर हैदराबादला पहिला धक्का बसला. त्यानंतर मयंक आणि राहुल त्रिपाठी यांनी हैदराबादचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण इशांत शर्मा याने राहुल त्रिपाठी याला 15 धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर एका बाजूला मयंक अग्रवाल याने दमदार फलंदाजी केली. पण अक्षर पटेल याने मयंकची खेळी संपुष्टात आणली. मयंक याने 49 धावांचे योगदान दिले. मयंक बाद झाल्यानंतर एडन मार्करम आणि अभिषेक शर्माही तंबूत परतले. अभिषेक शर्मा 5 तर एडन मार्करम तीन धावांवर तंबूत परतला. 


आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर हैदराबादचा डाव अडचणीत सापडला होता. पाच बाद 85 धावसंख्यावरुन वॉशिंगटन सुंदर आणि हेनरिक कालसन यांनी डाव सावरला. कालसन याने 19 चेंडूत 31 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावले. तर वॉशिंगट सुंदर याने नाबाद 24 धावांची खेळी केली. सुंदर याने 15 चेंडूत तीन चौकारासह 24 धावांचे योगदान दिले. पण सुंदर संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हैदराबादकडून नॉर्खिया आमि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. मुकेश कुमार याला विकेट मिळाली नाही.. पण अखेरच्या षटकात त्याने इम्पॅक्ट गोलंदाजी केली. 


दरम्यान,  डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत मजल मारली.  अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंगटन सुंदर यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीच्या फंलदाजंनी नांगी टाकली.  


नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. फिलिप साल्ट खातेही न उघडता माघारी परतला. भुवनेश्वर कुमार याने साल्ट याला शून्यावर बाद केले. साल्ट बाद झाल्यानंतर कर्णधार डेविड वॉर्नर आणि अष्टपैलू मिचेलम मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियन जोडी जमली असे वाटले तेव्हाच नटराजन याने मिचेल मार्श याला बाद केले. मार्श याने 25 धावांचे योगदान दिले. मार्श बाद झाल्यानंतर वॉर्नर याने सर्फराजच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वॉशिंगटन सुंदर याने एकाच षटकात दिल्लीला तीन धक्के दिले. डेविड वॉर्नर, सर्फराज आणि अमन खान यांना सूंदर याने तंबूत पाठवले. 


कर्णधार डेविड वॉर्नर याने 21 धावांचे योगदान दिले. सर्फराज खान याला 10 धावा करता आल्या तर अमन खान चार धावांवर बाद झाला. या तीन विकेट एकाच षटकात पडल्यामुळे दिल्लीच्या फलंदाजीला खिंडार पडले. पण अनुभवी मनिष पांडे आणि अक्षर पटेल यांनी दिल्लीचा डाव सावरला. दोघांनी दिल्लीसाठी लढा दिला. 


अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांनी दिल्लीचा डाव सावरला. दोघांनी संयमी फलंदाजी करत दिल्लीची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण भुवनेश्वर कुमार याने अक्षर पेटल याला बोल्ड करत हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. अक्षर पटेल याने 34 धवांचे योगदान दिले. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर मनिष पांडेही लगेच धावबाद झाला. मनिष पांडे याने 34 धावांचे योगदान दिले. ही जोडी फुटल्यानंतर दिल्लीचा डाव पुन्हा कोसळला. रीपल पटेल, नॉर्खिया स्वस्तात बाद झाले. रिपल पटेल याने पाच धावांचे योगदान दिले. तर नॉर्खिया दोन धावांवर बाद झाला. इशांत शर्मा आमि कुलदीप यादव नाबाद राहिले. 


दिल्लीच्या फलंदाजांनी आज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. दिल्लीच्या एकाही फलंजाला अर्धशतक झळकावता आले नाही. दिल्लीकडून फक्त दोन षटकार लगावण्यात आले. तर 15 चौकार लगावण्यात आले. दिल्लीच्या फंलदाजांनी अनेक चेंडू निर्धाव खेळले. हैदराबादच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच अचूक टप्प्यावर मारा केला. मारको जानसेनचा अपवाद वगळता प्रत्येक गोलंदाजांनी धावा रोखल्या. भुवनेश्वर कुमार याने चार षटकात 11 धावा देत दोन विकेट घेतल्या. तर वॉशिंगटन सूंदर याने चार षटकात 28 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. नटराजन याने एक विकेट घेतली.