IPL 2023 Viral Video: आयपीएलमध्ये (IPL 2023) काल (मंगळवारी) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) हे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळवण्यात आला. मात्र, या सामन्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (David Warner) गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) आऊट केलं, पण बेल्स पडल्याच नाहीत आणि लाईट्सही लागले नाहीत. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला नॉट आऊट घोषित केलं.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. त्याचवेळी गुजरात टायटन्सचे खेळाडू रिव्ह्यू घेण्याचा विचार करत राहिले, मात्र कर्णधार हार्दिक पांड्याने रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. खरं तर त्यावेळी यष्टिरक्षक वृद्धिमान साहा व्यतिरिक्त गुजरात टायटन्सच्या बाकीच्या खेळाडूंना वाटलं की, चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या बॅटच्या कडेने येऊन विकेटकिपरपर्यंत पोहोचला. पण चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या बॅटला लागलाच नसल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट झालं. मात्र चेंडू विकेटला स्पर्श करुन गेला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वॉर्नर-सर्फराजचा संघर्ष
दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि सर्फराज खान संघर्ष करताना दिसले. दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती. पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. डेविड वॉर्नर 32 चेंडूत 37 धावा काढून बाद झाला. तर सर्फराज खान याने 34 चेंडूत 30 धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले.
दिल्लीची फलंदाजी ढासळली
गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची फलंदाजी ढासळली. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रीले रुसे यांना लौकिसास साजेशी खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ अवघ्या सात धावा काढून बाद झाला. तर रुसोला खातेही उघडता आले नाही. मिचेल मार्श अवघ्या चार धावा काढून बाद झाला. लागोपाठ विकेट पडल्यामुळे दिल्लीची धावसंखेला खीळ बसली. अमन खान यालाही संधीचे सोने करता आले नाही. अमन खान आठ धावांवर बाद झाला.
दिल्ली-गुजरात संघात बदल
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला. केन विल्यमसन दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेबाहेर गेलाय. त्याच्या जागी गुजरातने डेविड मिलर याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले. तर दिल्लीच्या संघात दोन बदल करण्यात आले. दिल्लीने एनरिक नॉर्किया आणि अभिषेक पोरेल यांना प्लेईंग 11 मध्ये संधी दिली. दिल्लीने रॉमन पॉवेल याला प्लेईंग 11 मधून वगळलं होतं.