CSK Injury Update : वानखेडे स्टेडिअमवर शनिवारी झालेल्या लढतीत चेन्नईने मुंबईचा दारुण पराभव केला. या सामन्यात बेन स्टोक्सला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले नव्हते.. याचे कारण आता समोर आलेय. बेन स्टोक्स याला सरावादरम्यान दुखापत झाली होती, अशी माहिती चेन्नईने दिली आहे. वानखेडेवर झालेल्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान बेन स्टोक्स दुखापतग्रस्ता झाला होता. त्याच्या पायाच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाली आहे, त्यामुळे मुंबईविरोधात तो प्लेईंग 11 चा भाग नव्हता, अशी माहिती चेन्नईने ट्वीट करत दिली आहे. बेन स्टोक्स याची दुखापत किती गंभीर आहे, तो किती दिवस प्लेईंग 11 च्या बाहेर असेल.. याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
बेन स्टोक्स याच्याशिवाय दीपक चहरही दुखापतग्रस्त झाल्याची माहिती चेन्नईने दिली आहे. मुंबईविरोधात शनिवारी झालेल्या सामन्यात चहर दुखापतग्रस्त झाला आहे. वानखेडेवरील सामन्यादरम्यान चहरला हॅमस्ट्रींगचा त्रास झाला होता. फक्त एक षटक टाकल्यानंतर चहर तंबूत परतला होता. फिजिओ चहरच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्याचे स्कॅन करण्यात येणार आहे, त्यानंतर दुखापत किती गंभीर आहे, याबाबत समजेल. दीपक चहर आणि बेन स्टोक्स यांच्या दुखापतीवर फिजिओ आणि मेडिकल स्टाफ लक्ष ठूवन आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर ते संघासोबत जोडले जातील, असेही चेन्नईने ट्वीटमध्ये म्हटलेय. दीपक चहरची दुखापत किती गंभीर आहे, याची कोणताही माहिती मिळालेली नाही. पण सुत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, चहरची दुखापत गंभीर असून पुढील चार ते पाच सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. चहरचा दुखापतीशी जुना संबंध आहे. या दुखापतीमुळे चहर इंडियन प्रीमियर 2022 च्या संपूर्ण हंगामात खेळू शकला नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून चहरला दुखापतीमुळे त्रस्त आहे.
दीपक चहर आणि बेन स्टोक्स यांच्या दुखपातीमुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन स्टार खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे चेन्नई संघ पुढील सामन्यात काय रणनिती आखतो, याकडे लक्ष लागले आहेत. मुंबईविरोधात मोईन अलीही उपलब्ध नव्हता. त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले नव्हते. मोईन अली पुढील सामन्यासाठी उपलब्ध आहे की, याबाबत अद्याप कोणताही सविस्तर माहिती मिळालेली नाही.
चेन्नईचा मुंबईवर सात विकेट्सने विजय
वानखेडेच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेटने पराभव करत वस्त्रहरण केले. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. मुंबईने दिलेले 158 धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि 11 चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर हा मुंबईचा दुसरा पराभव आहे.