IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम सध्या रंगात आहे. प्लेऑफमधील चार स्थानासाठी दहा संघामध्ये चुरस सुरु आहे. अशातच दिल्लीमध्ये कर्णधाराच्या पत्नीचा दोन तरुणांनी पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 


कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नीतीश राणा हिच्या पत्नीच्या कारचा दिल्लीत दोन तरुणांनी पाठलाग केला. नीतीश राणाची पत्नी Saachi Marwah हिने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु झाली. दिल्ली पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. कामावरुन घरी येत असताना नीतीश राणाच्या पत्नीचा दोन तरुणांनी पाठलाग केला. दिल्लीतील क्रांतीनगरमधील फोटो साची मारवाह हिने पोस्ट केला आहे.






दिल्ली पोलिसांनी पाठलाग करणाऱ्या त्या दोन तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामधील एका तरुणाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतीश राणाची पत्नी साची मारवाह काम आटोपून घरी निघाली होती. त्यावेळी दिल्लीतील क्रांती नगर येथे दोन तरुणांनी बाईकवरुन पाठलाग केला. पाठलाग करण्याबरोबरच  कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला. साची मारवाह यांनी हिमतीने सामना केला. त्यांनी त्या तरुणाचे फोटो मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. 


दिल्ली पोलिसांचा अजब सल्ला - 


आपल्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंगानतर साची मारवाह हिने थेट पोलिस स्टेशन गाठलं. तिने दिल्ली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आणि तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी यावेळी साचीला दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला धक्का वाटेल. पोलिस सल्ला देत म्हणाले की, ' आता तू सुरक्षित पोहचली आहेस ना. त्यामुळे आता जे झालं ते विसरून जा. जर या पुढे अशी घटना घडली तर गाडीचा नंबर नोट करून ठेव.'  


2019 मध्ये झाले लग्न - 


नितीश राणाची पत्नी साची मारवाह व्यवसायाने इंटिरियर डिझाइनर आहे. नितीश आणि साचीने फेब्रुवारी 2019मध्ये लग्न केलं. साचीने अंसल विद्यापीठाच्या सुशांत स्कूल ऑफ डिजाइन इथून आपलं शिक्षण पूर्ण केलं. साचीने अनेक नामांकित इंटिरियर डिझाइनर्सकडून प्रशिक्षणही घेतलं आहे.