IPL 2023, Ravindra Jadeja: चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये त्यांचा स्पर्धेतील बारावा लीग सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला, ज्यामध्ये चेन्नईचा 27 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. सर्वात आधी फलंदाजी करताना चेन्नईनं 20 षटकांत 8 गडी गमावून 167 धावा केल्या आणि त्यानंतर 27 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर चेन्नईचा स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजानं मात्र आपली एक खंत व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, चाहते माझ्या आऊट होण्याची वाट पाहत असतात, कारण त्यांना धोनीला खेळताना पाहायचं असतं.
जाडेजानं कालच्या सामन्यानंतर माध्यमांसमोर खंत व्यक्त केली. तो म्हणाला की, चाहते त्याच्या बाद होण्याची वाट पाहत असतात. धोनीची बॅटिंग पाहण्यासाठी चाहते मी लवकर आऊट होण्याची वाट पाहत असतात असं त्यानं सांगितलं. जाडेजा म्हणाला, "जर मी लवकर फलंदाजीसाठी आलो तर ते सर्वजण 'माही माही' अशा घोषणा देतात आणि एमएस धोनीला पाहण्यासाठी प्रार्थना करतात, ते सर्व माझी आऊट होण्याची वाट पाहत असतात."
धोनीची शानदार खेळी
दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्यानं शानदार खेळी केली. त्यानं 222.22 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना 9 चेंडूत 20 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. धोनीच्या या खेळीमुळे चेन्नईला चांगली धावसंख्या गाठता आली.
आतापर्यंत स्पर्धेत धोनीचा धमाकेदार फॉर्म
महेंद्रसिंह धोनीनं आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत आपल्या चाहत्यांना निराश केलेलं नाही. त्यानं अनेक डाव खेळले आहेत. धोनी आतापर्यंत 8 डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे, ज्यामध्ये त्यानं 48 च्या सरासरीनं आणि 204.26 च्या स्ट्राइक रेटनं 96 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा हाई स्कोअर 32 आहे. यादरम्यान त्यानं एकूण 10 षटकार आणि 3 चौकार लगावले आहेत.