Kuldeep Sen, IPL 2022 : आयपीएलच्या प्रत्येक हंगामाप्रमाणेच 15 व्या हंगामातही काही युवा खेळाडूंनी प्रभावित केलेय. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन यानेही लक्ष वेधले आहे. आधी लखनौ आणि आता आरसीबीविरोधात कुलदीप सेन याने भेदक मारा केला. कुलदीप सेनच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचा संघ ढेपाळला. आरसीबीच्या फलंदाजीचं कंबरड मोडणाऱ्या कुलदीप सेनबद्दल जाणून घेऊयात...
25 वर्षीय कुलदीप सेन मध्यप्रदेशकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतो. यंदा आयपीएलमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. कुलदीप सेन याने राजस्थानकडून पदार्पण केलेय. पहिल्याच आयपीएल स्पर्धेत कुलदीपने सर्वांना प्रभावित केलेय.
चर्चा का ?
कुलदीपने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात कमाल केली होती. अखेरचं षटक टाकताना कुलदीपने लखनौच्या मार्कस स्टॉयनिसला खेळू दिले नाही. अखेरच्या षटकात 15 धावांचा बचाव करताना कुलदीपने भेदक मारा केला होता. तेव्हापासून कुलदीप चर्चेत...
मंगळवारी आरसीबीबरोबर झालेल्या सामन्यात कुलदीपने भेदक मारा केला. कुलदीपने 3.3 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. यामध्ये आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, वानंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांचा समावेश होता. कुलदीप सेन याने आयपीएलच्या तीन सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत.
कुटुंब -
कुलदीप सेन सर्वसामान्य कुटुंबातून आलाय. मध्यप्रदेशमधील रिवा येथे त्याचं घर आहे. कुलदीपचे वडील सलून चालवतात. घरची परिस्थिती असल्यामुळे कुलदीपला ट्रेनिंगसाठीही पैसे मिळत नव्हते. आठ वर्षाचा होता तेव्हापासून कुलदीप क्रिकेटचे धडे गिरवतोय. घरची परिस्थिती पाहून त्या अकादमीने कुलदीपची सर्व फी माफ केली होती. कुलदीपने अंडर 19 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केले. दुखापतीमुळे त्याला अंडर 25 मध्ये स्थान मिळाले नव्हते. दुखापत झाल्यानंतर लोकांकडून पैसे घेऊन कुलदीपने उपचार घेतले होते. कुलदीपने खूप मेहनत घेत यश मिळवले आहे. कुलदीपने एकदाही ट्रेनिंग सेशन मिस केले नाही.
आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी कुलदीपला राजस्थानकडून ट्रायलसाठी फोन आला होता. ज्या दिवशी ट्रायल होते, त्याच दिवशी त्याला सरकारी नोकरीची फिटनेस टेस्ट द्यायची होती. कुलदीप संभ्रमात पडला होता. पण सुदैवाने ट्रायल आणि फिटनेससाठी वेगवेगळा वेळ मिळाला. कुलदीप सध्या सरकारी कर्मचारी आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये कशी कामगिरी?
कुलदीप सेन याने 2018 मध्ये मध्य प्रदेशकडून स्तानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेने त्याची खूप मदत केली. कुलदीपने आतापर्यंत 16 फर्स्ट-क्लास, पाच लिस्ट-ए आणि 21 टी-20 सामने खेळले आहेत.