IPL 2022, SRH vs KKR : राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने कोलकात्याचा सात गड्यांनी पराभव केला आहे. यासह हैदराबादने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. कोलकात्यानं दिलेलं 176 धावांचं आव्हानं हैदराबादने सात विकेट आणि 13 चेंडू राखून पार केले. कोलकात्याच्या एकाही गोलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. राहुल त्रिपाठी आणि मार्करमच्या वादळापुढे कोलकात्याची गोलंदाजी दुबळी दिसत होती. 


कोलकात्यानं दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात अभिषेक शर्मा बाद झाला. त्यानंतर कर्णधार विल्यमसनही माघारी परतला. अभिषेक शर्मा 3 तर विल्यमसन 17 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि मार्करम यांनी हैदराबादला विजय मिळवून दिला. दोघांनी कोलकात्याची गोलंदाजी फोडून काढली. राहुल त्रिपाठीने 37 चेंडूत 71 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राहुलने सहा षटकार आणि चार चौकार लगावले. तर एडन मार्करम याने 36 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मार्करम याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांनी 54 चेंडूत 94 धावांची भागिदारी केली. कोलकात्याच्या गोलंदाजांना अचूक टप्यावर मारा करता आला नाही. राहुल-मार्करम यांनी प्रत्येक गोलंदाजांची धुलाई केली. कोलकात्याकडून रसेलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्सला एक विकेट मिळाली. 


नितेश राणाची अर्धशतकी खेळी आणि आंद्रे रसेलचा फिनिशिंग टचच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या. नितेश राणा याने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेल याने 49 धावांची खेळी केली.  हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्या षटकापासूनच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. दुसऱ्याच षटकात फिंचला बाद करत हैदराबादला पहिलं यश मिळालं. त्यानंतर कोलकात्याची फलंदाजी ढासळली. एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. फिंच (7), वेंकटेश अय्यर (6), सुनेल नारायण (6), शेल्डन जॅक्सन (7) आणि पॅट कमिन्स (3) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. कर्णधार श्रेयस अय्यर याने 28 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण उमरान मलिकच्या भेदक यॉर्करवर अय्यर बाद झाला. 


नितेश राणाचे अर्धशतक, आंद्रे रसेलचा फिनिशिंग टच - 
एका बाजूला विकेट पडत असताना नितेश राणाने संयमी फलंदाजी केली. नितेश राणाने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. राणाने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राणाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. पण मोक्याच्या क्षणी नितेश राणा बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा कोलकात्याचा डाव कोसळला. पण आंद्रे रसेल याने सर्व सुत्रे आपल्याकडे घेत गोलंदाजांची पिटाई केली. आंद्रे रसेल याने 25 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रसेलने चार षटकार आणि चार चौकार लगावले. 


हैदराबादचा भेदक मारा - 
हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. कोलकात्याच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. ठरावीक अंतराने कोलकात्याच्या विकेट घेतल्या. हैदराबादकडून नटराजन याने सर्वाधिक भेदक मारा केला. नटराजन याने चार षटकार तीन विकेट घेतल्या. तर युवा उमरान मलिक यानेदोन विकेट घेतल्या. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन आणि जगदिश सुचित यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.