MI vs KKR :  पॅट कमिन्सने मोक्याच्या क्षणी केलेली वादळी खेळी आणि सलामी फलंदाज वेंकटेश अय्यरचे संयमी अर्धशतकाच्या जोरावार कोलकाता संघाने मुंबईचा पाच विकेटनं पराभव केला. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान कोलकाताने अवघ्या 16 व्या षटकात पार केले. कमिन्सने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. कमिन्स आणि वेंकटेश अय्यर यांनी 18 चेंडूत 61 धावांची भागिदारी केली. या जोरावर कोलकाताने अशक्यप्राय विजय मिळवला आहे. 

Continues below advertisement


मुंबईने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कोलकाताने नियमित अंतराने आपल्या विकेट फेकल्या. सलामी फंलदाज अजिंक्य रहाणे 7, कर्णधार श्रेयस अय्यर 10, सॅम बिलिंग्स 17, नितेश राणा 8 आणि आंद्रे रसेल 11 धांवावर बाद झाले. एका बाजूने वेंकटेश अय्यर किल्ला लढवत होता, मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाज हराकिरी करत होते. त्यामुळे कोलकाता संघ पराभवाच्या छायेत पोहचला होता. मात्र, पॅट कमिन्स याने वादळी खेळी करत मुंबईला विजयापासून दूर ठेवले. पॅट कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत 56 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान कमिन्सने सहा षटकार आणि चार चौकार लगावले. 


मुंबईकडून डॅनिअल सॅम सर्वात महागडा गोलंदाज ठरला. डॅनिअल सॅमने तीन षटकात 50 धावा दिल्या. तर टायले मिल्सच्या तीन षटकात 38 धावा वसूल केल्या. एम. अश्विनने तीन षटकात 25 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर मिल्सलाही दोन विकेट भेटल्या. शिवाय डॅनिअल सॅम्सने एक विकेट घेतली.


दरम्यान, केकेआरने सुरुवातीला दमदार गोलंदाजी केली, ज्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने दमदार फलंदाजी करत 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा 3 आणि ईशान किशन 14 धावा करुन तंबूत परतले. डी ब्रेव्हिसने मात्र 19 चेंडूत 29 धावांची छोटी पण तुफान खेळी केली. ज्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी दमदार भागिदारी करत संघाला एक चांगली धावसंख्या मिळवून दिली. यावेळी सूर्याने 52 तर तिलकने नाबाद 38 धावा केल्या. अखेरच्या षटकात येत पोलार्डने तीन षटकार ठोकत 22 धावा केल्या. ज्यामुळे मुंबईने 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.