IPL 2022, MI vs PBKS : बेबी एबी म्हणून ओळखला जाणाऱ्या  डेवाल्ड ब्रेविसची (Dewald Brevis) वादळी फलंदाजी पुण्याच्या एमसीए मैदानावर पाहायला मिळाली. पंजाबने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामी फलंदाज लवकर तंबूत परतले होते. मुंबईच्या अडचणी वाढल्या होत्या. यावेळी डेवाल्ड ब्रेविसची मैदानार एन्ट्री झाली. ब्रेविस सुरुवातील संथ खेळत होता. पहिल्या आठ चेंडूवर ब्रेविस यांनी संथ फलंदाजी केली. मात्र, फिरकीपटू राहुल चाहरच्या पहिल्याच षटकात वादळी फलंदाजी केली. राहुल चाहरच्या या षटकात ब्रेविसने तब्बल 29 धावा चोपल्या. ब्रेविसच्या तुफानी फलंदाजीनंतर रोहित शर्माला मैदानावर येण्याचा मोह आवरला नाही. राहुल चाहरचं षटक संपल्यानंतर रोहित शर्मा तात्काळ मैदानावर आला. त्याने युवा ब्रेविसला मिठ्ठी मारत आनंद साजरा केला.


नववे षटक टाकण्यासाठी पंजाबकडून राहुल चाहर आला होता. या षटकात बेबी एबीने वादळी फलंदाजी केली. बेबी एबीने या षटकात चार षटकार आणि एक चौकारासह 29 धावा चोपल्या. इतकेच नाही तर अखेरच्या चार चेंडूवर बेबी एबीने सलग चार षटकार लगावले. बेबी एबीच्या या फटकेबाजीनंतर मुंबईच्या विजयाची आशा वाढली आहे. 


राहुल चाहरच्या षटकात 29 धावा कशा निघाल्या... (Dewald Brevis Vs Rahul Chahar) 
• 8.1 षटक - एक धाव, तिलक वर्मा 
• 8.2 षटक - 4 धावा, डेवाल्ड ब्रेविस
 • 8.3 षटक - 6 धावा, डेवाल्ड ब्रेविस 
• 8.4 षटक - 6 धावा, डेवाल्ड ब्रेविस 
• 8.5 षटक - 6 धावा, डेवाल्ड ब्रेविस 
• 8.6 षटक  - 6 धावा, डेवाल्ड ब्रेविस 


18 वर्षीय डेवाल्ड ब्रेविसने 25 चेंडूत 49 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान ब्रेविस याने चार चौकार आणि पाच षटकार लगावले.  बेबी एबीच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केले आहे. सोशल मीडियावर बेबी एबी ट्रेंड होत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी झालेल्या लिलावात मुंबईने 18 वर्षीय डेवाल्ड ब्रेविसला तीन कोटी रुपयांत खरेदी केले होते. ब्रेविसने नुकत्याच झालेल्या अंडर 19 विश्वचषकात वादळी फलंदाजी केली होती. ब्रेविसच्या फलंदाजीचा ट्रान्स, स्टाइल, आणि चौफेर फटकेबाजी करण्याच्या कलेमुळे त्याला बेबी एबी म्हणून ओळखलं जातं.