IPL 2022 : पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या पाचही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या चाहत्यांना या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा पराभव नेमका का होतोय? याची चर्चाही सोशल मीडिया आणि कट्ट्यावर सुरु आहे. रेल्वेच्या बोगीपासून चहाच्या टपरीवर मुंबईच्या पराभवाची चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण मुंबईच्या पराभवाची कारणं शोधत आहे. आपणही मुंबईच्या पराभवाची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.... 


संघ बांधणी - 
आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी मेगा लिलाव झाला. त्याआधी फक्त चार खेळाडूंना मुंबईला रिटेन करता आलं. त्यानंतर लिलावात ईशान किशनला विकत घेतलं. पण मुंबईला हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या, राहुल चाहर, डिकॉक आणि क्विंटन डिकॉक यासारख्या तगड्या खेळाडूंना गमावावं लागलं. त्यामुळे मुंबईला नव्याने संघबाधंणी करावी लागली. यंदा मुंबईच्या संघात अनेक नव्या खेळाडूंचा भरणा आहे. फलंदाजीसह गोलंदाजीही मुंबईची कमकुवत असल्याचं दिसत आहे. 


गोलंदाजी - 
जसप्रीत बुमराहच्या जोडीला मुंबईत एकही दर्जेदार गोलंदाज नसल्याचं दिसत आहे. त्यातच बुमराहही आपल्या लयीत नसल्याचं दिसतेय. फिरकी गोलंदाजीही तितकी प्रभावी नाही. एम अश्विनला प्रभावी कामगिरी करता आली नाही. तर डॅनिअल सॅम्स महागडा ठरतो. मुंबईच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश येत आहे. फिरकी गोलंदाजीही प्रभावी दिसत नाही. यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांविरोधाता धावांचा पाऊस पाडत आहेत. 


लोअर ऑर्डर - 
हार्दिक पंड्या आणि क्रृणाल पंड्याच्या अनुपस्थितीमुळे मुंबईची लोअर ऑर्डर दुबळी झाली आहे. मुंबईला या दोन खेळाडूंची कमी भासत असणार. हार्दिक आणि क्रृणाल नेहमीच फिनिशिंग टच देत होते. आता हा भार एकट्या पोलार्डवर आलाय. 


दिग्गज अपयशी - 
कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. कर्णधार रोहित शर्माला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आले नाही. पोलार्ड आणि रोहितचा फॉर्म संघासाठी चिंतेचा ठरत आहे. या खेळाडूंची कामगिरीही मुंबईच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरतेय. 


आयपीएल 15 मधील मुंबईची कामगिरी - 
पहिला सामना - दिल्लीकडून चार विकेटने पराभव
दुसरा सामना - राजस्थान रॉयल्सचा 23 धावांनी विजय
तिसरा सामना - कोलकात्याचा पाच विकेटने विजय
चौथा सामना - आरसीबीचा सात गड्यांनी विजय
पाचवा सामना - पंजाबचा 12 धावांनी विजय