IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्या दिल्लीचा (DC) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग खेळाबाबत खूप गंभीर असतो, हे आपण नेहमीच पाहिलं आहे. दरम्यान, कोलकाता आणि दिल्ली यांच्यात रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात असंच काहीसे घडले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात रिकी पाँटिंग पंचाशी वाद घालताना दिसत आहे. या व्हिडिओमुळं नेटकऱ्यांनी रिकी पाँटिंगला चांगलंच ट्रोल केलं आहे. 


दरम्यान, पाँटिंग पंचाशी वाद का घालत होता? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हा संपूर्ण प्रकार दिल्लीच्या डावातील 19 व्या षटकात घडला. या षटकात शार्दुल ठाकूरनं उमेश यादवच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर रिकी पाँटिंग फोर्थ अंपायरशी वाद घालताना दिसला. प्रशिक्षक प्रविण आमरे आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतही नाराज असल्याचं त्यावेळी दिसलं.



सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू
सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेत पंचानी कोणता चेंडू वाईड न दिल्यानं रिकी पाँटिंग भडकल्याचं सांगितलं जात आहे. तर, काही जण असं म्हणत आहे की, मैदानावर एक अतिरिक्त खेळाडू होता. ज्यामुळं रिकी पाँटिंग पंचावर रागवले. दरम्यान, शार्दुल ठाकूरनं 11 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या. ज्याच्या जोरावर दिल्लीच्या संघानं 215 धावांचा डोंगर उभा केला. 


दिल्लीचा 44 धावांचा विजय
आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्लीला 44 धावांनी मात देत एका दमदार विजयाची नोंद केली. सामन्यात दिल्लीनं दमदार फटकेबाजी आणि नंतर उत्तम गोलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या कोलकात्याला पराभूत केलं आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 216 धावांचे तगडे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले तर केकेआरला 20 षटकात 171 धावांवर रोखलं. 


हे देखील वाचा-