Indian Premier League 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पुढील हंगामाचा लिलाव लवकरच होणार आहे. अहवालानुसार, IPL 2022 चा लिलाव या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होणार आहे. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आज सांगितले की, आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी लिलावात तो आपले नाव देणार आहे. कारण, त्याला या लीगमध्ये नवीन सुरुवात करायची आहे. त्याने सेन रेडिओ स्टेशनला याबाबत माहिती दिली. याचा अर्थ तो सनरायझर्स हैदराबाद खेळेल की नाही शंका आहे.
सनरायझर्स हैदराबादला त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2016 चे विजेतेपद मिळवून देणारा डेव्हिड वॉर्नर म्हणाला, "निश्चितपणे मी माझे नाव लिलावात ठेवीन, कारण सनरायझर्स हैदराबादला पुन्हा संघात कायम ठेवण्याची मला अपेक्षा नाही. त्यामुळे पुढच्या हंगामात मी माझे नाव लिलावात ठेवेन. मला नवीन सुरुवात करायची आहे."
वॉर्नर सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. तो म्हणाला, "सनरायझर्स हैदराबादकडून त्याला संघातून वगळण्याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मी या संघासोबत आठ हंगाम घालवले आहेत. यादरम्यान संघाने 2016 मध्ये विजेतेपद पटकावले होते. याचा मला आनंद आहे."
आयपीएल 2021 मध्ये वॉर्नरची अशीच कामगिरी होती
आयपीएल 2021 च्या दोन्ही अर्ध्या भागात वॉर्नरची बॅट शांत होती. याच कारणामुळे त्याला स्पर्धेच्या शेवटी प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. तसेच यापूर्वी खराब फॉर्म आणि काही चुकीच्या निर्णयांमुळे त्याला कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले होते. IPL 2021 च्या आठ सामन्यांमध्ये वॉर्नरने 24.37 च्या सरासरीने आणि 107.73 च्या स्ट्राइक रेटने बॅटने फक्त 195 धावा केल्या.
केन विल्यमसन सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2021 सीझनमध्ये एक मोठा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नरला कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे आणि त्याच्या जागी केन विल्यमसन याच्याकडे कर्णधारपद सोपवलं गेलं आहे. आता केन विल्यमसन आगामी सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून दिसणार आहे. आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादने सहा सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला. पॉईंट टेबलमध्ये ही टीम अंतिम स्थानावर आहे. आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या टीमचं नेतृत्त्व करेल आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा कर्णधार म्हणून तो दिसणार आहे.