आयपीएल लीगच्या आगामी हंगामासाठी फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराची क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती जाहीर केली. रॉयल्स फ्रँचायझीच्या संपूर्ण क्रिकेट इकोसिस्टमवर नजर ठेवण्याची जबाबदारी एमसीसीचे विद्यमान अध्यक्ष संगकारा यांच्यावर असेल. यात कोचिंग स्ट्रक्चर, लिलाव योजना, संघ कार्यनीती, टॅलेंट शोध आणि डेव्हलपमेंट इत्यादींचा समावेश आहे. यासह, नागपुरातील रॉयल्स अॅकॅडमीच्या विकासासाठी संगकारा जबाबदार असणार आहे.


संगकारा यांनी या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "रॉयल्समध्ये सामील झाल्याने मला आनंद होत आहे आणि नवीन आव्हानांसाठी मी तयार आहे. मी या संघाला बळकट करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन."




ते पुढे म्हणाले की, जगातील प्रमुख स्पर्धेत एखाद्या फ्रँचायझीची क्रिकेट रणनीती आखताना या आयपीएल टीमच्या भविष्यातील यशाचा पाया तयार करायचा आहे. क्रिकेटसाठी पायाभूत सुविधा तयार करणे ही एक संधी आहे, ज्याने मला खरोखरच प्रेरणा दिली आहे.


या नियुक्तीबाबत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, संगकाराला अफाट अनुभव आहे आणि तो आधुनिक क्रिकेटला चांगल्या प्रकारे जाणतो. आतापर्यंतच्या महान यष्टिरक्षकांसोबत काम करणे हा अभिमानाचा क्षण असेल.


संगकारा आयपीएलमध्येही खूप खेळला आहे. श्रीलंकेकडून संगकाराने 28 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याची कारकीर्द 16 वर्षांची राहिली आहे. या काळात त्याची कसोटी सरासरी गेल्या 46 वर्षातील सर्व फलंदाजांपेक्षा चांगली होती.