IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड आपल्या नावे एक विक्रम करण्याच्या तयारीत आहे. कायरन पोलार्ड आयपीएलच्या इतिहासात 200 षटकार लगावणारा खेळाडू म्हणून विक्रम करण्यासाठी सज्ज आहे. केवळ दोन षटकार आणि हा विक्रम पोलार्ड आपल्या नावे करु शकतो. 


कायरन पोलार्ड 2010 मध्ये पदार्पण केल्यापासूनच मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पोलार्डने आतापर्यंत 164 आयपीएल (IPL) सामने खेळले आहेत. 164 सामन्यांच्या 147 डावांत पोलार्डने 198 षटकार लगावले आहेत. आरसीबीच्या विरोधात सामन्यात दोन षटकार लगावून पोलार्डकडे आयपीएलमधील 200 षटकार लगावण्याचा बहुमान मिळवण्याची संधी आहे. 



पोलार्डच्या नावावर अनेक विक्रम 


आयपीएलमध्ये पोलार्डचा रेकॉर्ड उत्तम राहिला आहे. पोलार्डने 147 डावांमध्ये जवळपास 30 च्या सरासरीने 150 स्ट्राइक रेटने 3023 धावा केल्या आहेत. पोलार्डने आयपीएलमध्ये 15 अर्धशतकं लगावली आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोअर 83 धावांचा आहे. 


फलंदाजी व्यतिरिक्त पोलार्डने महत्त्वाच्या क्षणी मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करत महत्त्वाची भूमिकाही निभावली आहे. पोलार्डने आयपीएलच्या 92 डावांत गोलंदाजी करत 60 विकेट्स घेतले आहेत. 


या फलंदाजांच्या नावावर 200 हून अधिक षटकारांचा विक्रम 


कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये 200 षटकार लगावण्याचा विक्रम रचणारा पहिला खेळाडू नसणार, तर यापूर्वीही अनेक खेळाडूंनी हा विक्रम आपल्या नावे केला आहे. पोलार्डपूर्वी 5 फलंदाजांनी आयपीएलमध्ये 200 हून अधिक षटकार लगावण्याचा विक्रम रचला आहे. सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 349 षटकार लगावले आहेत. 


दुसऱ्या क्रमांकावर एबी डीविलियर्स आहे. ज्याने 235 षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनी 216 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर, तर रोहित शर्मा 213 षटकारांसह चौथ्या आणि विराट कोहली 201 षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :