नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नंबर 7 ऐवजी वरच्या क्रमांकावर खेळायला हवं असा सल्ला भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांनी दिलाय. आयपीएलच्या या हंगामात धोनीची सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग खाते न उघडताच बाद झाला. गंभीर म्हणाले की, धोनी हा पूर्वीसारखा खेळाडू राहिला नाही जो खेळपट्टीवर येताच चौकार लगावेल. धोनीने वरच्या क्रमांकावर खेळायला यायला हवे. कारण, त्याला समोर येऊन संघाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, "हे प्रत्येकाला माहिती आहे, की लीडरने समोर येऊन नेतृत्व करावे. जर आपण सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असाल तर आपण नेतृत्व करू शकत नाही." कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार म्हणाला की चेन्नईच्या गोलंदाजीत काही अडचणी आहेत. पण, धोनी वरच्या क्रमांकावर खेळणे संघासाठी फायद्याचे ठरू शकते.
गंभीर म्हणाले, "चेन्नईच्या गोलंदाजी विभागात काही समस्या आहेत. त्याशिवाय धोनी आता पूर्वीसारखा राहिला नाही जसा पाच वर्षांपूर्वी खेळपट्टीवर उतरुन स्फोटक फलंदाजी करीत असे. मला वाटतं की त्याने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उतरावे"
मागील हंगामात अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात या आयपीएल मोसमातही चांगली झाली नाही. सुरुवातीच्या सामन्यात चेन्नईचा दिल्ली कॅपिटलने 7 गडी राखून पराभव केला. आज चेन्नईचा सामना पंजाबशी होणार आहे. अशा परिस्थितीत धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने हंगामातील पहिला विजय नोंदवणे आवश्यक पाहिजे.