IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने हैदराबादवर 20 धावांनी मात केली. चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा तिसरा विजय ठरला. या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला विजयासाठी 168 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर हैदराबादला 8 बाद 147 धावांचीच मजल मारता आली. केन विल्यमसनची 57 धावा करुन एकाकी झुंज दिली. तर चेन्नईच्या कर्ण शर्मा, ड्वेन ब्राव्होनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनी आपल्या जुन्या अंदाजात परतल्याचं पाहायला मिळालं.


यंदाच्या मोसमात चेन्नईने एकूण आठ सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संघासोबतच संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला टीकेचा सामना करावा लागत होता. परंतु, मंगळवारी झालेल्या सामन्यात धोनीसह चेन्नईच्या सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विजयाला गवसणी घातली. धोनीने मंगळवारी 13 चेंडूंमध्ये 161 हून अधिक स्ट्राइक रेटसह 21 धावा केल्या. धोनीच्या या खेळीत दोन षटकारांचा समावेश होता. यापैकी एक षटकार धोनीने 102 मीटर लांब फटकावला. धोनीचा हा सर्वात क्लासी शॉट पाहून सर्व चाहत्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही.


पाहा व्हिडीओ :


धोनीच्या या षटकारांची तुलना 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये फटकावलेल्या षटकारासोबत केली जात आहे. 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने 102 मीटर लांब षटकार फटकावला होता. दोन्ही षटकार 102 मीटर लांब असल्याने यांची तुलना करण्यात येत आहे.


कालच्या सामन्यांत सीएसकेच्या संघाने 15.2 ओव्हर्समध्ये 120 धावांवर चार विकेट्स गमावले आहेत. परंतु, धोनीच्या खेळीमुळे 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावत 167 धावांचं आव्हान हैदराबादसमोर ठेवण्यात चेन्नईला यश मिळालं. चेन्नईचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या हैदराबादच्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 147 धावा केल्या आणि सीएसकेने 20 धावांनी हैदराबादवर मात केली.


दरम्यान, सीएसकेने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले असून आतापर्यंत केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. कालच्या विजयामुळे धोनीच्या संघाने पुन्हा एकदा वापसी केली असून प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या अपेक्षा कायम ठेवल्या आहेत. जर कालच्या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला असता, तर मात्र संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेला असता.