संयुक्त अरब अमिरात...म्हणजेच यूएई. मध्यपूर्वेतील याच संपन्न देशात शनिवारपासून (19 सप्टेंबर) पुढचे जवळपास दोन महिने यंदाच्या आयपीएलचा महासोहळा रंगणार आहे.


खरंतर दरवर्षीप्रमाणे मार्च ते मेदरम्यान आयपीएल खेळवली जाणार होती. पण भारतात कोरोनाचा प्रभाव वाढला आणि ही स्पर्धा देशाबाहेर खेळवण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यासाठी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका यांसारखे पर्यायही समोर आले. पण अखेर कोरोनाचा कमीतकमी प्रभाव असलेल्या यूएईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन करण्याचं बीसीसीआयने पक्क केलं.


यूएईची राजधानी अबुधाबी, दुबई आणि शारजाह या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये आयपीएलचं हे युद्ध रंगणार आहे.


पाहूया कोणत्या स्टेडियम्सवर आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.


दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम



दुबईतल्या या नव्या स्टेडियमवर आयपीएलच्या 56 साखळी सामन्यांपैकी सर्वाधिक 24 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यासोबतच अंतिम सामनाही याच स्टेडियमवर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.


शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी



यंदाच्या आयपीएलचा उद्घाटनाचा सामना अबुधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडणार आहे. यासह एकूण 20 साखळी सामने या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.


शारजाह क्रिकेट स्टेडियम



यूएईतलं सर्वात जुनं स्टेडियम असलेलं शारजाह क्रिकेट स्टेडियम हे यंदाच्या आयपीएल सामन्यांसाठीचं तिसरं ठिकाण आहे. याठिकाणी 12 साखळी सामने खेळवले जाणार आहेत.


आयपीएलचं आयोजन देशाबाहेर करण्याची ही आजवरची तिसरी वेळ आहे. याआधी लोकसभा निवडणुकांमुळे 2009 साली दक्षिण आफ्रिकेत तर 2014 साली दुबईतच आयपीएलचा सोहळा रंगला होता.


आयपीएलवर कोरोनाचा प्रभाव
आयपीएल म्हटलं की प्रेक्षकांनी भरलेली स्टेडियम्स, 40-50 हजार प्रेक्षकांचा तो जल्लोष, फलंदाजांच्या चौकार-षटकारानंतर स्टेडियममध्ये घुमणारा आवाज... हे सगळं दरवर्षी आपण पाहतो. पण यंदा ते वातावरण आपल्याला दिसणार नाही आणि याचं कारण अर्थातच कोरोना


कोरोनामुळे यंदाचं आयपीएल बंद दाराआड म्हणजेच रिकाम्या स्टेडियम्समध्ये खेळवलं जाणार आहे. कोरोनाच्या या वातावरणाचा परिणाम संघांच्या तयारीवरही दिसून येतोय. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यास त्याचा फटका संपूर्ण संघाला बसू शकतो. यासाठी बायो सिक्युअर बबलसारख्या सुरक्षेच्या उपाययोजना बीसीसीआयकडून राबवण्यात येत आहेत.


एकूणच यंदाचं आयपीएल खास असणार आहे. कोरोनाचं संकट, त्यामुळे स्पर्धेचं बदललेलं वेळापत्रक, खेळाडूंची सुरक्षितता या सगळ्या बाबी आय़पीएलच्या दृष्टीने तितक्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे आयपीएलचा हा तेरावा मोसम कसा पार पडतो याचीच आता उत्सुकता आहे.