IPL Mini Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान लिलाव म्हटलं की प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न येत असतात, त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेस प्राईस म्हणजे काय? आता प्रत्येक लिलावात सामिल होणाऱ्या खेळाडूची एक बेस प्राईस असते, त्यावर लिलावात बोली लावली जाते. पण ही बेस प्राईस नक्की काय असते? ती कोण ठरवतं? याबद्दलची रंजक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


काय असते बेस प्राईस?


बेस प्राईस ही खेळाडूचा लिलाव सुरू होणारी किंमत आहे. उदाहरणार्थ, जर खेळाडूची मूळ किंमत 1 कोटी रुपये असेल, तर त्याच्यासाठी बोली 1 कोटी रुपयांपासून सुरू होईल आणि त्यानंतर ती तिथून पुढे नेली जाईल. जर खेळाडूवर एकाच संघाने बोली लावली तर खेळाडू त्याच्या मूळ किंमतीत म्हणजे फक्त एक कोटी रुपयांना विकला जाईल. त्यापेक्षा कमी किंमतीत खेळाडू विकत घेता येणार नाही म्हणून बेस प्राईस अत्यंत महत्त्वाची असते.
 
कशी आणि कोण ठरवतं बेस प्राईस?


खेळाडू स्वतः त्यांची आधारभूत किंमत ठरवतात आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सांगतात. बेस प्राईस निश्चित करण्याबरोबरच खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट बोर्डाकडून देखील ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं. जे बीसीसीआयला सादर करावं लागतं. खेळाडूंची मूळ किंमत 20 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. फारच कमी खेळाडू दोन कोटींची मूळ किंमत ठेवतात आणि बहुतेक मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचीच बेस प्राईस 2 कोटी असते. तर अनकॅप्ड खेळाडू अनेकदा त्यांची मूळ किंमत 20 लाख रुपये इतकी ठेवतात. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे ते खेळाडू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही. काहीवेळा कमी बेस प्राईस असणारे खेळाडूही लिलावात मोठ्या किंमतीला विकले जातात. 


यंदा 'या' देशांतील खेळाडूंचा लिलावात समावेश


कोची येथे होणाऱ्या या मिनी ऑक्शनमध्ये भारताचे एकूण 273 खेळाडू असतील. तर, इंग्लंडचे 27 खेळाडू, दक्षिण आफ्रिकेचे 22 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे 21 खेळाडू, वेस्ट इंडिजचे 20 खेळाडू, न्यूझीलंडचे 10 खेळाडू, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे 8 खेळाडू, आयर्लंडचे 4 खेळाडू, बांगलादेशचे 4 खेळाडू, झिम्बाब्वेचे 2 खेळाडू, नामिबियाचे 2 खेळाडू, नेदरलँड आणि यूएई यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आलाय. 


हे देखील वाचा-