ICC T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड झालेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वचषक जिंकण्यासाठी उतरणार आहे. ऋषभ पंत याचं संघात कमबॅक झाले, पण रिंकू सिंह याला 15 जणांच्या चमूमध्ये स्थान मिळाले नाही. रिंकू सिंह याला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलेय. भारतीय संघाच्या निवडीवर भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने नाराजी व्यक्त केली आहे. एएनआयसोबत बोलताना भज्जी म्हणाला की टीम इंडियाला विश्वचषकात रिंकू सिंह याची कमी जाणवेल. त्याशिवाय चार फिरकी गोलंदाजाच्या निवडीवरही त्याने आश्चर्य व्यक्त केले.
एक वेगवान गोलंदाज कमी -
भज्जी म्हणाला की, टीम इंडियाची फलंदाजी चांगली आहे. पण एक वेगवान गोलंदाज कमी असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय रिंकू सिंह याला आपण मिस करु... कारण त्याच्यामध्ये एकहाती सामना जिंकण्याची क्षमता आहे. तो 20 चेंडूत 60 धावाही काढू शकतो. चार फिरकी गोलंदाजाची निवड करणं हेही चकीत करणारे आहे. टीम इंडियाला विश्वचषकासाठी शुभेच्छा!
4 फिरकी गोलंदाजासह खेळणार नाही -
भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह म्हणाला की, भारतीय संघ एका सामन्यात चार फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल, असं मला वाटत नाही. रवींद्र जडेजाचा अलीकडचा फॉर्म पाहता तो आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. त्याच्यासोबत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. कदाचित आपण एका सामन्यात तीन फिरकीपटूंसोबतही जाऊ शकतो.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
टी -20 वर्ल्ड कपमधील भारताचे सामने
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. भारताशिवाय आयरलँड, अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडाचा समावेश आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान 9 जूनला आमने सामने येणार आहेत.भारताची तिसरी मॅच यूएस विरुद्ध 12 जून आणि चौथी 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.