Harshit Rana Mitchell Starc : अटीतटीच्या सामन्यात कोलकात्यानं (KKR) हैदराबादचा (SRH) अवघ्या चार धावांनी पराभव केला. कोलकात्यानं (KKR) दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघानं 204 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन एकटाच लढला, तो पहाडासारखा उभा राहिला, पण अखेरच्या षटकात सामना फिरला. हर्षित राणानं अखेरच्या षटकात भेदक मारा करत 13 धावांचा यशस्वी बचाव केला. विशेष म्हणजे, हर्षित राणापुढे (Harshit Rana) जम बसलेला आक्रमक क्लासेन होता. तरीही हर्षित राणा यानं अचूक टप्प्यावर मारा केला. 


स्टार्कला जमलं नाही, ते हर्षितनं केले - 


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी फोडून काढण्यात आली. मिचेल स्टार्क यालाही क्लासेनला बाद करता आलं नाही. मिचेल स्टार्कसाठी कोलकात्यानं 24.75 कोटी रुपये खर्च केले. पण पहिल्याच सामन्यात त्याची गोलंदाजी फेल ठरली. मिचेल स्टार्क यानं 4 षटकात तब्बल 53 धावा खर्च केल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. मिचेल स्टार्क यानं 19 वं षटक टाकलं, पण त्या षटकात त्याला खूप मार बसला. मिचेल स्टार्कच्या या षटकात क्लासेन आणि शाहबाज यांनी तब्बल 26 धावा वसूल केल्या. 






अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी फक्त 13 धावांची गरज होती.  19 व्या षटकात स्टार्कला चोप बसला होता. क्लासेन सेट झालेला होता, त्यामुळे नवखा हर्षितलाही चोप बसेल, असाच सर्वांचा अंदाज होता. पण 20 लाख रुपयांमध्ये ताफ्यात घेतलेल्या हर्षितनं अचूक टप्प्यावर मारा करत 13 धावांचा यशस्वी बचाव केला. हर्षित यानं 4 षटकात 33 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. 






20 व्या षटकात काय झालं? 


अखेरच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. पण हर्षित राणा यानं भेदक मारा केला. हर्षित राणाच्या पहिल्या चेंडूवर क्लासेन यानं षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. हैदराबादला विजयासाठी 4 चेंडूत सहा धावांची गरज होती. शाहबाजनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. त्यानंतर मार्को यान्सन यानं एक धाव काढली. 2 चेंडूत पाच धावांची गरज होती, त्यावेळी स्ट्राईकला क्लासेन आला. हा सामना हैदराबादच जिंकणार असं वाटलं होतं. पण हर्षित राणा यानं शानदार चेंडू टाकला अन् त्यापेक्षा शानदार झेल सुयश शर्मानं घेतला. मोक्याच्या क्षणी जम बसलेला क्लासेन बाद झाला. एका चेंडूत पाच धावांची गरज होती. त्यावेळी कर्णधार पॅट कमिन्स स्वत: मैदानात उतरला. पण हर्षित राणा यानं अखेरचा चेंडू निर्धाव टाकत विजय मिळवला.