Kolkata Knight Riders vs Gujarat Titans : आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सची गाडी रोखणे केवळ कठीणच नाही तर अशक्यही वाटत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली या संघाने आता केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर 39 धावांनी पराभूत केले आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 198 धावा केल्या. त्यानंतर केकेआरची फलंदाजी अपयशी ठरली आणि त्यांना या हंगामातील पाचवा सामना गमावावा लागला. दुसरीकडे, गुजरात संघाने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. शुभमन गिल हा गुजरातच्या विजयाचा हिरो होता. गुजरातच्या कर्णधाराने 55 चेंडूत 90 धावा केल्या.  

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांचे वादळ... 

प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्या जोडीने पुन्हा एकदा तुफानी सुरूवात करून दिली. त्यांनी मिळून केकेआरच्या गोलंदाजांना धू-धू धुतले आणि पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करण्याची ही चौथी वेळ होती. ही जोडी तोडण्याचे काम आंद्रे रसेलने केले. ज्याने सुदर्शनला आऊट केले. सुदर्शन 36 चेंडूत 52 धावा करून आऊट झाला. आयपीएलच्या चालू हंगामातील सुदर्शनचे हे पाचवे अर्धशतक होते.

10 धावांनी हुकले कर्णधार गिलचे शतक

सुदर्शन आऊट झाल्यानंतर कर्णधाराला साथ देण्यासाठी जोस बटलर क्रीजवर आला. बटलर आल्यानंतर गिलने वेगाने धावा काढायला सुरुवात केली आणि तो त्याच्या शतकाकडे वेगाने वाटचाल करत होता. पण, गिलचे शतक अवघ्या 10 धावांनी हुकले. वैभव अरोराने गिलला 90 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गिल आऊट झाल्यानंतर, राहुल तेवतिया आला, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. तेवतियाला त्याचे खातेही उघडता आले नाही. बटलरने शेवटच्या षटकांमध्ये आपली ताकद दाखवली. तो 23 चेंडूत 41 धावा करून नाबाद राहिला. तर, शाहरुख खानने 5 चेंडूत 11* धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेल, वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

अजिंक्य रहाणेने ठोकले अर्धशतक, उपकर्णधार व्यंकटेश अय्यर फेल

199 धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खूपच खराब झाली. सिराजने पहिल्याच षटकात गुरबाजला आऊट केले, आणि केकेआर बॅकफुटवर फेकले. यानंतर, नरेन आणि रहाणे यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण सहाव्या षटकात राशिद खानने नरेनची विकेट घेतली. नरेनने 12 चेंडूत 17 धावा केल्या. यानंतर, व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यात एक छोटीशी भागीदारी झाली, पण अय्यर पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 14 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणेने अर्धशतक ठोकले. पण त्याची विकेट 13 व्या षटकात साई किशोरने घेतली. रहाणेने 37 चेंडूत 50 धावा केल्या.

रसेल मसलची बॅट पुन्हा एकदा शांत

यानंतर, रसेलची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. रसेल फक्त 21 धावा करू शकला, रशीद खानने त्याची शिकार केली. यानंतर, प्रसिद्ध कृष्णाने एकाच षटकात रमणदीप आणि मोईन अलीला आऊट करून केकेआरच्या आशा संपुष्टात आणल्या.  कोलकाताचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावल्यानंतर फक्त 158 धावाच करू शकला.