IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत आयपीएलचे तीन सामने झाले आहेत. यामध्ये दिल्ली, कोलकाता आणि पंजाबने विजय मिळवला आहे. तर चेन्नई, आरसीबी आणि मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. तिन्हीही सामने रोमांचक झाले. यामध्ये तीन भारतीय खेळाडू चमकले आहेत. या तीन खेळाडूंमध्ये त्यांचं अडनाव समान आहे. होय.. यादव...कदाचीत तुम्हाला अंदाज आला आसेल. आयपीएलमधील पहिल्या तीन सामन्यात उमेश यादव, कुलदीप यादव आणि ललीत यादव चमकले आहेत. या खेळाडूंनी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने मजेदार ट्वीट करत तिघांचे कौतुक केले आहे.
सेहवागने काय म्हटलेय?
आतापर्यंतचं आयपीएल यादवांच्या नावावर राहिलेय. उमेश आणि कुलदीप यांची जबरदस्त कामगिरी, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा!
फक्त वीरेंद्र सेहवागचं नाही तर सोशल मीडियावर यादव नावाची चर्चा आहे. सामन्यानंतर मीम्सचा पाऊस पडला आहे. काही जणांनी उमेश, कुलदीप आणि ललीत यांचे फोटो वापरुन अनेक मीम्स तयार केले आहेत. या तिन्ही खेळाडूंवर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी कौतुकांची थाप टाकली आहे.
आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात कोलकाताकडून उमेश यादवने भेदक मारा केला होता. उमेश यादवच्या गोलंदाजीपुढे बलाढ्या चेन्नईचे शेर ढेर झाले होते. चार षटकांत उमेश यादवने 20 धावा देत दोन गडी बाद केले. उमेश यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात दिल्लीच्या दोन खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. कुलदीप यादवने आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केले. कुलदीपने चार षटकात 18 धावा देत तीन गडी बाद केले. विशेष म्हणजे, कुलदीपच्या गोलंदाजीवर मुंबईकर फलंदाजांना एकही चौकार, षटकार मारता आला नाही. दिल्लीच्याच ललीत यादव याने दमदार फलंदाजी करताना 48 धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. ललीत यादव आणि अक्षर पटेल याच्या भागिदारीच्या बळावर पंजाबने मुंबईचा पराभव केला.