IPL 2022 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. दहा संघ तब्बल दोन महिने एकमेंकाशी स्पर्धा करणार आहेत. पण आयपीएल स्पर्धा असली तरी भारतीय संघव्यवस्थापन (Team India) या स्पर्धेकडे बारीक लक्ष ठेवून आहे. कारण, वर्षाअखेर टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी (T 20 World cup) भारताच्या संघात काही खेळाडूंना आयपीएलमधील कामगिरीतून संधी मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेतून 11 खेळाडूंचं नशिब ठरणार आहे. पाहूयात कोणते आहेत हे खेळाडू.... स्थानिक स्पर्धेत खेळाडूंनीही कितीही दमदार कामगिरी केली तरी भारतीय निवड समिती त्याकडे तितकेस लक्ष देत नाही. कारण, या स्पर्धेची सोशल मीडियावर फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे खेळाडूंची कामगिरी नजरअंदाज होते. आयपीएलमध्ये खेळाडूची कामगिरी दमदार झाल्यास सोशल मीडियावर चर्चा होते. अन् खेळाडू लगेच चर्चेत येतो. त्यामुळे आयपीएल स्पर्धा काही खेळाडूंसाठी महत्वाची ठरणार आहे. 


दिल्लीच्या अक्षर पटेल आणि कुलदीप यांनी यांनी मोक्याच्या क्षणी दमदार कामगिरी करत लक्ष वेधलं आहे. कुलदीप यादवने भेदक मारा केला तर अक्षर पटेलने विस्फोटक फलंदाजी केली. आयपीएलमधील पुढील कामगिरीवर त्यांचं टीम इंडियातील स्थान ठरणार आहे. ईशान किशननेही (Ishan Kishan) पहिल्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करत आपली दावेदारी दिली आहे. विकेटकिपर फलंदाज म्हणून ईशानचा विचार होऊ शकतो.   आयपीएलमध्ये सर्वाधिक लक्ष हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर असणार आहे. हार्दिक पांड्या दुखापतीनंतर मैदानावर पुनरागमन करतोय. दुबईत झालेल्या टी 20 विश्वचषकानंतर हार्दिक पांड्या मैदानावर परतलेला नाही. त्यामुळे विश्वचषकाच्या भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास हार्दिक पांड्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. त्याशिवाय गोलंदाजीतही त्याला योगदान द्यावे लागणार आहे. 


विराट कोहलीने आयपीएलमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी न केल्यास विश्वचषकातील स्थान धोक्यात येऊ शकते. मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांची नजर आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या दोन अनुभवी खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीवरही निवड समितीचं लक्ष असणार आहे. हे दोन्ही खेळाडू दुबईत झालेल्या टी 20 विश्वचषकाचा भाग होते.  युवा राहुल चाहर (Rahul Chahar) आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) या दोन खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे.  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा हर्षल पटेल (Harshal Patel) आणि कोलकाता नाइट राइडर्सचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.   


याशिवाय आयपीएलमधील इतर अनेक खेळाडूंच्या कामगिरीकडे निवड समिती आणि टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाचे लक्ष असणार आहे. आयपीएलमधील कामगिरी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी महत्वीची ठरणार आहे. त्यामुळे ही आयपीएल स्पर्धा विश्वचषकाची रंगीत तालीम आहे.