Gautam Gambhir KL Rahul Lucknow Super Giants Eliminator IPL 2022 : कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनौला पराभवाचा सामना करावा लागला. करो या मरोच्या सामन्यात आरसीबीने लखनौचा 14 धावांनी पराभव केला. यासह लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. आरसीबीकडून पराभव झाल्यानंतर गौतम गंभीर आणि राहुल यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये गौतम गंभीर लखनौचा कर्णधार राहुलवर नाराज असल्याचे दिसतेय. गौतम गंभीर राहुलकडे रागाने पाहत असल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झालाय.
एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 207 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल लखनौचा संघ 193 धावांपर्यंतच मजल मारु शकला. यासामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने 79 धावांची जबरदस्त खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात राहुलला अपयश आले. लखनौच्या पराभवानंतर राहुल आणि गौतम गंभीर यांचा फोटो व्हायरल झालाय. यामध्ये गौतम गंभीर राहुलकडे रागात पाहत असल्याचे दिसतेय. फोटो पाहून गौतम गंभीर राहुलवर भडकल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी लावलाय.
लखनौचा कर्णधार केएल राहुलने यंदाच्या आयपीएल हंगामात दमदार कामगिरी केली आहे. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. एलिमिनेटर सामन्यात पराभव जाला असला तरी राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाची कामगिरीही सन्माजनक राहिली आहे. 14 सामन्यात 9 विजय मिळवत लखनौने गुणतालिकेत तिसरे स्थान काबिज केले होते.
14 धावांनी लखनौ पराभूत -
नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार राहुलने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर बंगळुरुची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार फाफ शून्यावर बाद झाल्यानंतर रजतने संघाचा डाव सांभाळला. रजतने दमदार असं शतक लगावल्याने आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावरच हा धावांचा डोंगर उभा केला. 208 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. संघाकडून केवळ राहुल आणि दीपक हुड्डा यांनी चांगली फलंदाजी केली. 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी दोघांनी केली. दीपक हुड्डा 26 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. तर राहुलही 79 धावांवर बाद धाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात लुईसला लखनौला विजय मिळवून देण्यात अपयश आले आणि आरसीबीचा 14 धावांनी विजय झाला.