Rajasthan Royals : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्लेऑफच्या चार संघ ठरले आहेत. गुजरात, राजस्थान, लखनौ आणि आरसीबी यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये राजस्थान एकमेव संघ आहे, ज्याने आयपीएल चषक उंचावलाय. तर लखनौ आणि गुजरात पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहेत. तर आरसीबीला आतपार्यंत एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. राजस्थानला यंदाच्या आयपीएल विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. 
 
राजस्थानचा संघ संतुलीत आहे. फलंदाज, गोलंदाज यांचा भरणा आहे. जोस बटलर, संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल तुफान फॉर्ममध्ये आहेत. चहल-अश्विन विकेटवर विकेट घेत आहेत. बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णापुढे फलंदाज गुडघे टेकत आहेत. विशेष म्हणजे, पर्पल आणि ऑरेंज कॅप राजस्थानच्या खेळाडूकडे आहे. जोस बटलर आणि यजुवेंद्र चहल सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू आहे. या दोघांच्या जिवावार राजस्थान संघाने दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. राजस्थानचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याची शक्यता आहे. 


 सध्या ऑरेंज आणि पर्पल कॅप राजस्थानच्या खेळाडूकडे आहे. म्हणजे, राजस्थानच्या खेळाडूने सर्वाधिक धावा आणि विकेट घेतल्या आहेत. सलामी फलंदाज जोस बटलरने 14 सामन्यात 48.38 च्या सरासरीने आणि  147 च्या स्ट्राइक रेटने 629 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन शतके आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत. दुसरीकडे फिरकीपटू यजुवेंद्र चाहलने  14 सामन्यात 16.53 च्या सरासरीने आणि 7.67 च्या इकॉनमीने 26 विकेट घेतल्या आहेत.  


यंदाच्या हंगामात राजस्थानचा संघ संतुलित दिसला. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक विभागात राजस्थानने सरस कामगिरी केली. रियान परागने अनेक जबरदस्त झेल घेत विक्रमाला गवसणी घातली.. पराग फिनिशिंगचा रोल चांगल्या पद्धीतने पार पाडत आहे. मागील काही सामन्यात जोस बटलरची बॅट शांत आहे. पण याचा काहीही परिणाम पडला नाही..  संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, यशस्वी जायसवाल आणि शिमरॉन हेटमायर यासारखे दर्जेदार फलंदाज आहेत. त्याशिवाय अश्विनही चांगली फलंदाजी करत आहे.  फलंदाजीशिवाय गोलंदाजीही चांगली आहे. युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेकांना फसवलेय.  ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध  कृष्णाच्या वेगवान माऱ्यापुढे अनेक फलंदाज हतबल होतात.