चेन्नई: इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच निराशाजनक होती. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनीच्या या संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. आयपीएल दरम्यान धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या सातत्याने येत असतानाच त्याने आयपीएलचा पुढचा हंगाम खेळण्याचे संकेत दिले होते. चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंट आता संघासाठी नवा कर्णधार निवडणार असल्याचे वृत्त येत आहे. हे वृत्त जर खरे ठरले तर तडाखेबाज फलंदाज फाफ ड्यू प्लेसिसच्या खांद्यावर संघाची धुरा येऊ शकते.
एकेकाळी टीम इंडियाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक असलेले संजय बांगर यांनी चेन्नईच्या कर्णधारपदासाठी फाफ ड्यू प्लेसिसचे नावाला पाठिंबा दर्शवला आहे. "धोनीने 2011 नंतर भारतीय संघाची धुरा सांभाळली. नंतरच्या काळात धोनीलाही जाणीव होती की परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर संघाकडे धोनीसाठी नवा पर्याय उपलब्ध नव्हता. विराट कोहलीच्या चांगल्या कामगिरीनंतर धोनीने कसोटी संघाचे कर्णधार पद सोडले." असे संजय बांगर यांनी सांगितले.
संजय बांगर यांनी सांगितले की, "मला जेवढे समजते त्यावरुन मी सांगू शकतो की पुढच्या आयपीएलच्या हंगामात धोनीने विकेट कीपर आणि फलंदाज म्हणून भाग घ्यावा, पण कर्णधारपद सोडावे. चेन्नईच्या कर्णधारपदी फाफ ड्यू प्लेसिसला संधी मिळाली तर संघ चांगली कामगिरी करु शकतो."
संजय बांगर यांच्या मते चेन्नई संघाकडे कर्णधारपदासाठी जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. त्यांनी सांगितले की, "कोणताही संघ अशा खेळाडूला सोडायला तयार नाही जो चेन्नई सुपर किंग्जची धुरा यशस्वीपणे सांभाळू शकेल."
महत्वाच्या बातम्या: