DC vs GT, IPL 2024 : अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सचा चार धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातनं 8 विकेटच्या मोबदल्यात 220 धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून साई सुदर्शन आणि डेविड मिलर यांनी अर्धशतक ठोकत संघर्ष केला. पण गुजरातच्या इतर फलंदाजांनी ठराविक अंतरानं विकेट फेकल्या. दिल्लीकडून रासिख सलाम खान यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 


दिल्लीने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. 100 आयपीएल सामना खेळणारा शुभमन गिल फक्त सहा धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर साई सुदर्शन आणि वृद्धीमान साहा यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. वृद्धीमान साहा यानं 25 चेंडूत 1 षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. पण त्यानंतर उमरजई यानं विकेट फेकली. उमरजई फक्त एक धाव काढून बाद झाला. साई सुदर्शन यानं दुसऱ्या बाजूनं शानदार फटकेबाजी केली. पण तोही 65 धावांवर बाद झाला. 


साई सुदर्शन यानं वृद्धीमान साहाच्या साथीनं गुजरातच्या डावाला आकार दिला. सुदर्शन यानं 39 चेंडूमध्ये 65 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. पण साई सुदर्शन याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर डेविड मिलर यानं किल्ला लढवला. पण मिलरलाही साथ मिळाली नाही. शाहरुख खान आणि राहुल तेवातिया झटपट बाद झाले. शाहरुख खान यानं फक्त 8 धावा केल्या, तर राहुल तेवातिया यानं 4 धावा केल्या.


एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला मिलर यानं शानदार फटकेबाजी केली. मिलर यानं गुजरातच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मिलर यानं 23 चेंडूमध्ये 55 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं तीन षटकार आणि सहा चौकार ठोकले.  अखेरीस राशिद कान आणि साई किशोर यांनी फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला. साई किशोर यानं 6 चेंडूमध्ये दोन षटकाराच्या मदतीने 13 धावांचं योगदान दिलं. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी 19 धावांची गरज होती. राशिद खान यानं अखेरपर्यंत लढा दिला. पण दिल्लीला पराभव करु शकला नाही. राशिद खान यानं 11 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 


दिल्लीकडून रासिख सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं गुजरातच्या तीन फलंदाजांना बाद केले. कुलदीप यादव यानं दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अक्षर पटेल, अॅनरिक नॉर्खिया आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.