Ruturaj Gaikwad : लखनौविरोधात शानदार शतक ठोकल्यानंतरही ऋतुराज गायकवाडच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात शतक ठोकलं. तरीही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. शतकानंतरही पराभव झालेल्या खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड याचा समावेश झाला आहे. ऋतुराज गायकवाडनं चेपॉकवर मंगळवारी लखनौविरोधात शतक ठोकलं. ऋतुराज गायकवाड शानदार शतक ठोकलं, पण त्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली.  विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान पटकावलेय.


कोणता रेकॉर्ड झाला ? -
आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स संघाचा पराभव झाल्यानंतर दोन शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरलाय. आयपीएलमध्ये शतक ठोकल्यानंतरही पराभवाचा सामना करणारा ऋतुराज गायकवाड चौथा फलंदाज ठरलाय. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.


पराभवानंतरही शतक ठोकणारे फलंदाज 


शतक ठोकल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीच्या आयपीएलमधील तीन शतकावेळी आरसीबीचा पराभव झालाय. या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडचा क्रमांक लागलाय.  ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शतकं ठोकली आहेत, त्या दोन्ही वेळा संघाचा पराभव झालाय. तिसऱ्या क्रमांकावर हाशीम आमलाचा क्रमांक लागतो, हाशिम आमलाने आयपीएलमध्ये दोन शतकं ठोकलीत, त्यामध्ये त्याच्या संघाचा पराभव झालाय. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसन यानं आयपीएलमध्ये दोन शतकं ठोकली आहेत, त्या दोन्हीवेळा संघाचा पराभव झालाय. 


ऋतुराज गायकवाडच्या नावावर दोन शतक - 


मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शतकं ठोकली आहेत. 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सविरोधात ऋतुराज गायकवाडनं शतक ठोकलं होतं. ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूमध्ये 101 धावांची खेळी केली होती. पण या सामन्यात चेन्नईचा सात विकेटने पराभव झाला होता. मंगळवारीही ऋतुराज गायकवाड यानं शतकी तडाखा ठोकला. पण लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने वादळी शतक ठोकत चेन्नईचा पराभव केला. ऋतुराज गायकवाच्या दोन्ही शतकावेळी चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागलाय. 


 दरम्यान,  चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव करुन लखनौ सुपर जाएंटसनं गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. लखनौनं पाच मॅच जिंकल्या असून त्यांच्याकडे 10 गुण आहेत.