Darshan Nalkande Profile : हैदराबादविरोधात अहमदाबाद येथे सुरु असलेल्या सामन्यात गुजरातच्या (SRH vs GT) ताफ्यात दोन बदल करण्यात आले. शुभमन गिल याने नाणेफेक गमावल्यानंतर प्लेईंग 11 मध्ये दोन बदल असल्याचे सांगितले.  स्पेन्सर जॉनसन याच्या जागी विदर्भाच्या दर्शन नळकांडे याला गुजरातने आजच्या सामन्यात स्थान दिले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दर्शन पहिलाच सामना खेळत आहे. 


दर्शन नळकांडे याला 2018 मध्ये पंजाब किंग्स संघाने विकत घतले होते.. पण त्याला प्लेईँग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पण गुजरातने दर्शन याला खेळण्याची संधी दिली आहे. दर्शनने आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने गुजरातकडून खेळले आहेत. दर्शन हा मूळचा वर्धा येथील आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाच्या संघाकडून खेळतो. वेगवान गोलंदाजीसोबत तळाला फलंदाजीमध्ये तो तरबेज आहे. 


कोण आहे दर्शन नळकांडे?


विदर्भाचा वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडे याला गुजरात टायटन्सने 2022 च्या लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत विकत घेतले होते. 2022 च्या हंगामात गुजरातकडून दर्शन याने आयपीएलमध्ये पदार्पण केले.आतापर्यंत त्याला फक्त तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. दर्शन नळकांडे याचा जन्म चार ऑक्टोबर 1998 रोजी वर्ध्यात झाला.2019 मध्ये दर्शन याने हिमाचलप्रदेशविरोधात विदर्भाकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेय.   आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दर्शन याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. 


दर्शनचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला आहेत. तर वकील असलेली त्याची आई अकोला विधी महाविद्यालयात व्याख्याता आहे. हे कुटूंब अकोल्यातील जठारपेठ भागात राहते. दर्शनची चारवेळा आयपीएलमध्ये निवड झाली. मात्र,गुजरात संघातून त्याला  खेळण्याची संधी मिळाली. 


दर्शनची आतापर्यंतची कामगिरी


दर्शन हा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्येही आपले योगदान देतो. विशेषकरुन शेवटच्या शटकांमध्ये चांगली फलंदाजीही करतो. दर्शनने 'मुश्ताक अली टी - 20' स्पर्धेत चार चेंडूत चार बळी घेतले होते. असा पराक्रम करणारा तो भारताचा दुसरा तर जगातला नववा गोलंदाज ठरला होता. गेल्यावर्षी मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत दर्शननं 13 बळी घेत टॉप 5 मध्ये स्थान पटकावले. गेल्या तीन वर्षांपासून दर्शन मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत टॉप 5 मध्ये आहे. या स्पर्धेत तीन वर्षांत दर्शनच्या नावावर 40 विकेट्सची नोंद. 


दर्शन नळकांडे याने 6 फर्स्ट क्लास सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. तर 29 लिस्ट ए सामन्यात त्याने 49 विकेट घेतल्या आहेत. 42 टी 20 सामन्यात दर्शनने 42 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजीमध्ये दर्शनने फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये आठ डावात 107 धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 327 धावांची नोंद आहे. टी 20 मध्ये दर्शनच्या नावावर 130 धावा आहेत. 


आयपीएलमध्ये दर्शनने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, यामध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. गेल्यावर्षी गुजरातने दर्शनला क्वालिफायर सामन्यात संधी दिली होती. 2022 मध्ये दर्शनने दोन आयपीएल सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या.