Latest Marathi News: CSK Vs RCB: IPL 2024: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai SuperKings) आयपीएलच्या 17व्या सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ((Royal Challengers Bengaluru)) 6 गड्यांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 बाद 173 धावांची मजल मारल्यानंतर चेन्नईने 18.4 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 4 षटकांत 29 धावा देत 4 विकेट्स पटकावल्या.
मुस्तफिजुर रहमानने त्याच्या पहिल्या दोन षटकांत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि आरसीबीच्या आक्रमक फलंदाजांना माघारी पाठवले. डुप्लेसिस आणि विराटने डावाची वेगवान सुरुवात केली होती. दोघांनी पहिल्या चार षटकात 37 धावा केल्या होत्या. यानंतर पाचव्या षटकात मुस्तफिजुर गोलंदाजी करायला आला आणि त्याने षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर डुप्लेसिसला झेलबाद केले. त्याला 23 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 35 धावा करता आल्या. यानंतर त्याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर रजत पाटीदार (0) झेलबाद झाला. मुस्तफिझूर इथेच थांबला नाही. त्यानंतर त्याने डावातील 12व्या षटकात आपले दुसरे षटक टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहली बाद केले. कोहलीला 20 चेंडूत 21 धावा करता आल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनचा त्रिफळा उडवला. ग्रीनला 22 चेंडूत 18 धावा करता आल्या.
18 मार्चला स्ट्रेचरवर-
मुस्तफिजुर रहमानची कालची गोलंदाजी आणखी एका कारणासाठी खूप खास आहे. कारण 18 मार्च रोजीच त्यांची प्रकृती वाईट होती. मुस्तफिजुर रहमानला सामना खेळत असताना स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले होते. हा प्रकार बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामन्यात घडला होता. या मालिकेत मुस्तफिजुर पहिलाच सामना खेळत होता. या सामन्यात मुस्तफिजुरने नऊ षटके टाकली आणि एकूण 39 धावा दिल्या. 10व्या षटकाच्या आधी, त्याला त्याच्या गोलंदाजीच्या हाताला काही त्रास झाला होता, तो पोट धरून जमिनीवर बसला होता. यावेळी मुस्तफिजुरची अवस्था अशी होती की त्याला चालताही येत नव्हते.
चेन्नईच्या पहिल्या विजयावर ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?
आम्ही पहिल्यापासून नियंत्रणात होतो. सर्वांनी चांगला खेळ केला. आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस लवकर माघारी पाठवल्याने संघाला फायदा झाला. आम्हाला तीन झटपट विकेट मिळाल्या आणि त्यामुळे आम्हाला पुढील षटकांवर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली, हाच खरा टर्निंग पॉइंट होता. मी कर्णधारपदाचा आनंद लुटला. अतिरिक्त दबाव म्हणून मला कधीच वाटले नाही. मला ते कसे हाताळायचे याचा अनुभव आहे. मला कधीही दबाव जाणवला नाही, अर्थातच माही भाई देखील होता, असं ऋतुराजने सांगितले. ऋतुराज पुढे म्हणाला की, आमच्या संघातील प्रत्येकजण नैसर्गिक स्ट्रोकप्लेअर आहे, असं मला वाटतं. जिंक्स (अजिंक्य रहाणे) देखील खरोखर सकारात्मक खेळत आहे. प्रत्येकाला त्यांची भूमिका आणि कोणत्या गोलंदाजांना सामोरे जायचे हे माहित आहे. दोन-तीन गोष्टींवर काम करायचे आहे, प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली. पण मला वाटते की पहिल्या 3 मधील फलंदाजांनी 15 व्या षटकापर्यंत फलंदाजी केली तर ते आणखी सोपे झाले असते.