CSK vs LSG, IPL 2022:  रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 210 धावांचा डोंगर उभा केला आहे. राहुलच्या लखनौला विजयासाठी 211 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. लखनौकडून रवी बिश्नोई याने दर्जेदार गोलंदाजी केली. लखनौचा कर्णधार के.एल. राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण चेन्नईच्या फलंदाजांनी पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेत धावांचा पाऊस पडला. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे याच्या आक्रमक खेळीला मोईन अली, रॉबिन उथप्पा यांनी चांगली साथ दिली. तर धोनीच्या फिनिश टचमुळे चेन्नईने 210 धावांपर्यंत मजल मारली.  लखनौकडून रवी बिश्नोई, आवेश खान आणि अँड्रू टाय यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 


रॉबिन उथप्पाची विस्फोटक खेळी - 
सलामीविर रॉबिन उथप्पा याने वादळी खेळी करत लखनौच्या गोलंदाजाची पिसे काढली. उथप्पाने सुरुवातीपासूनच लखनौच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. रॉबिन उथप्पाने अवघ्या 25 चेंडूत अर्शतक झळकावले. रवी बिश्नोईने उथप्पाचा अडथळा दूर केला. उथप्पाने एक षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. 


मोईन अली - अंबाती रायडूची छोटेखानी खेळी - 
अष्टपैलू मोईन अली आणि अंबाती रायडू यांनी छोटेखानी खेळी करत चेन्नईची धावसंख्या वाढवली. मोहईन अलीने  22 चेंडूत दोन षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. तर अंबाती रायडूने 20 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार लगावत 27 धावा जोडल्या. 


शिवम दुबेचं अर्धशतक हुकलं -
एका बाजूला विकेट पडत असताना शिवम दुबे याने दुसरी बाजू लावून धरली. दुबेने विकेट तर पडू दिली नाहीच, शिवाय धावांचा पाऊसही पाडला. पण शिवम दुबेचं अर्धशतक फक्त एका धावेनं हुकलं. दुबे 30 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान दुबेनं दोन षटकार आणि पाच चौकार लगावले.


धोनीचा पहिल्याच चेंडूवर षटकार - 
कर्णधारपद सोडल्यानंतर एम.एस धोनीचं आक्रमक रुप पुन्हा एकदा समोर आले आहे. लखनौविरोधात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. धोनीने सहा चेंडूत 16 धावांची खेळी केली. 


बिश्नोईचा भेदक मारा -
फिरकीपटू रवी बिश्नोई याने चेन्नईविरोधात अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. चेन्नईच्या फलंदाजांना बिश्नोईने कोणतीही संधी दिली नाही. बिश्नोईने चार षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले. बिश्नोई लखनौचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बिश्नोईने सर्वात कमी धावा खर्च केल्या.