CSK vs DC : आयपीएल 2024 मध्ये आज (रविवार, 31 मार्च) दोन सामने होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता दिल्ली आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. चेन्नईने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे, ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीच्या संघाचा पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव झालाय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. दिल्ली पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना विशाखापट्टनम (ACA–VDCA Cricket Stadium) येथे होणार आहे. 


विशाखापट्टनमची  खेळपट्टी कशी असेल ? 


डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत आयपीएलचा एकही सामना झालेला नाही. आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी हे मैदान तयार झाले आहे. विशाखापट्टनमच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, म्हणजेच फलंदाजांसाठी हे मैदान पोषक आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल. पण आज या मैदानावर गोलंदाजांनाही मदत मिळण्याची शक्यता आहे. नाणेफेक सर्वात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे, कारण या मैदानात आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. 


विशाखापट्टनममध्ये हवामान कसे असेल ?


दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्यावेळी विशाखापट्टनममध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप खूप कमी आहे. सामन्यावेळी पावसाची शक्यता फक्त पाच टक्के आहे. दव पडत असल्यामुळे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा फायदा होऊ शकतो. विशाखापट्टनममधील रविवारचे तापमान 27 डिग्रीच्या आसपास असू शकते. 


हेड टू हेड स्थिती कशी आहे ?


दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आयपीएलचे 29 सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने 19 वेळा विजय मिळवलाय, तर दिल्लीला फक्त 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. म्हणजेच, आकड्यावरुन सध्या तरी चेन्नईचं पारडं जड असल्याचे दिसतेय. 


 विशाखापट्टनमच्या मैदानाचा इतिहास काय - 


विशाखापट्टनमच्या मैदानात आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला तीन सामन्यात विजय मिळाला आहे. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने सात सामन्यात बाजी मारली आहे. दव पडत असल्यामुळे धावांचा पाठलाग करणं सोपं जाते.  


IPL 2024 दोन्ही संघाच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू : 


दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेविड वार्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल, एनरिक नोर्किया, कुलदीप यादव, जेक फ्रेजर-मॅकगर्क, खलील अहमद, ईशांत शर्मा, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिख डार, झाय रिचर्डसन, सुमित कुमार, स्वास्तिक चिकारा आणि शाय होप 


चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), मोइन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगारेकर, रवींद्र जाडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोळंकी, महेश तीक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिजवी, मुस्तफिजुर रहमान आणि अरवेल्ली अवनीश राव (विकेटकीपर)।