MI vs CSK, IPL 2024 : चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने एकट्याने झुंज दिली. रोहित शर्मानं नाबाद 105 धावांची खेळी केली. पण इतर फंलदाजांकडून मदत न मिळाल्यामुळे हिटमॅनचं शतक व्यर्थ ठरलं.  मुंबईने 20 षटकांमध्ये सहा विकेटच्या मोबदल्यात 186 धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्मानं नाबाद 105 धावांची खेळी केली. चेन्नईकडून मथिशा पथिराणा यानं 4 फलंदाजांना तंबूत धाडलं. 


चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानचा पाठलाग करताना मुंबईने शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी वादळी सुरुवात केली.  7 षटकांमध्ये मुंबईने 70 धावा उभारल्या होत्या. पण पथिराना गोलंदाजीला आला अन् मुंबईची दाणादाण उडाली. ईशान किशन यानं 15 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव याला खातेही खोलता आले नाही. हार्दिक पांड्या फक्त दोन धावा काढून बाद झाला. त्यानं दोन धावासाठी सहा चेंडू खर्च केले. रोमिरिओ शेफर्ड यालाही दोन चेंडूमध्ये फक्त एक धाव काढता आली. मोहम्मद नबी यानं सात चेंडूत 4 धावांची खेळी केली. 






तिलक वर्माला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. तिलक वर्माने 20 चेंडूमध्ये पाच चौकाराच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. मुंबईने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या, त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने प्रतिकार केला नाही. 


रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्माने एकट्याने लढा दिला. रोहित शर्माने 63 चेंडूमध्ये नाबाद 105 धावांची खेळी केली. यामध्ये पाच षटकार आणि 11चौकारांचा समावेश होता. रोहित शर्माने ईशान किशन याच्यासोबत 70 धावांची भागिदारी केली. तर तिलक वर्मा याच्यासोबत 60 धावांची भागिदारी केली. याशिवाय एकही मोठी भागिदारी झाली नाही. 







चेन्नईकडून पथिशा पथिराणा याने शानदार गोलंदाजी केली. पथिराणा यानं सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. त्यानं चार षटकांमध्ये चार फलंदाजांना तंबूत धाडलं. पथिराना यानं ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रोमिरिओ शेफर्ड यांना तंबूत धाडलं. एम रहमान आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.