Anrich Nortje, IPL 2023 : शनिवारी आयपीएलमध्ये डबल हेडर सामने आहेत. चेन्नई आणि मुंबई (CSK vs MI ) यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तर  सायंकाळी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात लढत होणार आहे. दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअमवर दिल्ली आणि आरसीबी आमने सामने असतील. आरसीबी (RCB) आणि दिल्ली यांच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला विजय आवश्यक आहे. पण या महत्वाच्या सामन्यापूर्वीच दिल्लीला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा एनरिक नॉर्खिया आजच्या सामन्याला उपलब्ध नाही. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.


मध्यरात्री एनरिक नॉर्खिया दक्षिण आफ्रिकेला परतला -


आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये आज रंगतदार सामना होणार आहे, पण या सामन्याला दिल्लीचा एनरिक नॉर्खिया उपलब्ध नसेल. तो अचानक मायदेशी परतलाय. दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दिल्लीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की,' पर्सनल कामासाठी एनरिक नॉर्खिया शुक्रवारी रात्री अचानक दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. आज आरसीबीविरोधात होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. '   






डेविड वार्नरच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्लस संघाला हा मोठा धक्का मानला जातोय. एनरिक नॉर्खिया दिल्लीची वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळत होता. आजचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायाक आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्ली आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. पण महत्वाच्या सामन्यात आघाडीचा गोलंदाज नसल्यामुळे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे. आरसीबीला प्लेऑफच्या दिशेन एक पाऊल पुढे टाकण्यासाठी विजय गरजेचा आहे. 






दिल्ली-आरसीबी यांच्यात रंगतदार लढत - 


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 29 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.