आयपीएलच्या मुंबईतल्या सामन्याचा मार्ग मोकळा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 07 Apr 2016 12:02 PM (IST)
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या आयपीएलवरील गंडांतर तूर्तास दूर झालं आहे. हायकोर्टाकडून आयपीएल सामन्यांवर बंदी घातली गेली नाही. त्यामुळे 9 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे. दरम्यान टॅंकरच्या पाण्याच्या स्रोताची चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बारा तारखेला चौकशी अहवाल सादर करण्यास हायकोर्टाने सांगितलं आहे. ऐन दुष्काळात पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवावेत अशी मागणी लोकसत्ता सामाजिक संस्थेनं कोर्टात केली होती. त्यावर आज राज्य सरकारला बाजू मांडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. नागपूर, मुंबई आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या 20 सामन्यांसाठी तब्बल 66 लाख लीटर पाणी वापरलं जाणार आहे. मात्र मराठवाड्यातील 8 जिल्हे दुष्काळानं होरपळत असताना ही चैन परवडण्यासारखी नाही, असं कोर्टानं म्हटलं होतं.