मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. नाशिकमधील मांजरपाडा - जिखा वळण योजनेचं रखडलेलं काम तातडीनं सुरु करण्यात यावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
या धरणाचं 70 टक्के काम पूर्ण झालं आहे. मात्र सुधारीत प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने ऑक्टोबर 2014 पासून हे काम बंद पडलं आहे. ते लवकरात - लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी करणारं पत्र छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.
पैशांचा गैरव्यवहार आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सध्या भुजबळांचा मुक्काम मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात आहे. तिथूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहलं आहे.
भुजबळांच्या पत्रातील मुद्दे
मांजरपाडा वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे 845 दशलक्षघनफूट (MLD) पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे.
- यातील 100 MLD पाणी स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे
- सध्या 8.96 किमी लांबीच्या बोगद्यापैकी 90 टक्के आणि 3.20 किमी लांबीच्या उघड्या चराचे काम पूर्ण झाले आहे
-तर धरणाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे
- पण सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून तपासणी करण्याच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश असल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही आणि ऑक्टोबर 2014 पासून काम बंद पडले आहे.
- मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्वासन दिले होते
- या प्रकल्पासाठी वेलमध्ये ठिय्या आंदोलन केले होते.
- याचा पाठपुरवठा करण्यासाठी तुरूंगातून पत्र लिहिलं आहे